Kalyan Crime : खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या अन पळवले सोन्या-चांदीचे दागिने, शहरात महिला चोरांचा सुळसुळाट
खरेदीच्या बहाण्याने दुकानात घुसून नजर चुकवून लाखो रुपयांचा माल पळवल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून त्या महिला चोरांचा शोध घेत आहेत.
कल्याण | 3 ऑक्टोबर 2023 : शहरातील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. छोट्या-मोठ्या चोऱ्यांपासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंतच्या घटनांनी नागरीक (crime cases) त्रासले आहेत. अशीच एक घटना कल्याण पूर्वेकडील दुकानात (crime in Kalyan) घडली. तीन महिला चोरांनी एक दुकानात घुसून मौल्यवान दागिने पळवल्याने दुकानादार महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भुरट्या चोर महिलांनी लाखो रुपयाचे दागिने लुटून पोबारा केला.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस अधिक तपास करत असन चोरी करणाऱ्या महिलांचाही शोध घेत आहेत. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे कोळसेवाडी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्या चोरांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
त्या दुकानात नेमकं काय घडलं ?
कल्याण पूर्व येथील शिवाजीनगर कोळसेवाडी भागात प्राजक्ता अभिषेक पवार यांचे कॉस्मेटिक्सचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी दुपारच्या वेळेस शोभेचे दागिने खरेदी करण्यासाठी तीन महिला त्यांच्या दुकानामध्ये आल्या. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघण्याच्या बहाण्याने दोघीजणींनी प्राजक्ता यांना बोलण्यात गुंतवले. तर त्यांचे लक्ष नाही हे पाहून तिसऱ्या महिलेने नजर चुकवून दुकानातील गल्ल्याजवळ ठेवलेली एक काळ्या रंगाची पिशवी चोरली आणि बॅगेत टाकली. तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार, त्या पिशवीमध्ये सोनं, चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम ठेवलेली होती.
दागिन्यांची पिशवीवर डल्ला मारल्यानंतर त्या तीनही महिला दुकानातून निघाल्या आणि फरार झाल्या. दुकानातील गल्ल्याजवळ ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे थोड्या वेळाने प्राजक्ता यांच्या लक्षात आले आणि त्यांचं धाबचं दणाणलं. त्यांनी संपूर्ण दुकानात शोध घेतला पण पिशवी कुठेच सापडली नाही. फोन करून त्यांनी घरीदेखील चौकशी केली, मात्र ती पिशवी घरातही नसल्याचे कुटुंबियांनी त्यांना सांगितले. त्यामुळे थोड्या वेळापूर्वी दुकानात आलेल्या त्या तीन महिलांनीच ती पिशवी चोरल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी लगेचच कोळसेवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि या प्रकरणाची तक्रार नोंदवली. त्या पिशवीत एकूण एक लाख २३ हजार रुपयांचा माल आणि रोख रक्कम होती, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून तीन भुरट्या महिला चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.