डॉक्टरांना मारहाण, बचावासाठी महिला खोलीत लपल्या, बलात्कार झालेल्या त्या हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री काय घडलं?
सीबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी तीन टीम्स बनवल्या आहेत. यापैकी एक टीम दुपारी 3.40 वाजता रुग्णालयात पोहोचली. ती टीम पावणेदहा वाजता बाहेर पडली. सहा तास सीबीआय टीम रुग्णालयात होती.
कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेज, रुग्णालय सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. याच रुग्णालयातील एका ज्यूनियर डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री याच रुग्णालयात हिंसाचार झाला. विरोध प्रदर्शनादरम्यान अचानक जमाव रुग्णालयात घुसला. अनियंत्रित जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. इमर्जन्सी वॉर्डला लक्ष्य केलं. डॉक्टर्स, स्टाफला मारहाण केली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. कोलकात्याच्या या रुग्णालयात मध्यरात्री काय घडलं? जाणून घेऊया.
कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी बंगालच्या अनेक शहरात रात्री उशिरा प्रदर्शन सुरु होतं. असंच एक प्रदर्शन कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटलबाहेर सुरु होतं. याच दरम्यान रुग्णालयात हिंसाचार झाला. बेकाबू जमाव बॅरिकेडींग तोडून रुग्णालयात घुसला. इमर्जन्सी वॉर्डसह रुग्णालयाच्या अनेक भागात तोडफोड केली.
50 पोलीस जखमी
तिथे उपस्थित डॉक्टरांना मारहाण केली. जमावापासून बचाव करण्यासाठी महिला गर्ल्स हॉस्पिटलच्या एका खोलीत लपल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झाली. पोलिसांच्या गाड्यांमध्ये सुद्धा तोडफोड करण्यात आली. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात 50 पोलीस जखमी झाले. हंगामा इतका वाढला की, मध्यरात्री कोलकात्याचे पोलीस आयुक्त रुग्णालयात गेले. रात्री 2 वाजता कोलकात्याचे पोलीस आयुक्त आरजी कर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यानंतर प्रकरण शांत झालं.
सीबीआयची टीम बाहेर पडताच हिंसाचार
कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केस प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. कोलकाता हाय कोर्टाच्या आदेशानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयकडे तपास सोपवला आहे. कोलकाता पोलिसांकडून सर्व कागदपत्र घेतल्यानंतर सीबीआयने तपास सुरु केला आहे. सीबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी तीन टीम्स बनवल्या आहेत. यापैकी एक टीम दुपारी 3.40 वाजता रुग्णालयात पोहोचली. ती टीम पावणेदहा वाजता बाहेर पडली. सहा तास सीबीआय टीम रुग्णालयात होती. सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमने अनेक पुरावे गोळा केला. सीबीआय टीम बाहेर पडल्यानंतर काही तासात रुग्णालयात हिंसाचार झाला.