चोर बनला हायटेक, मंदिराचा दानपेटीवर लावला स्वत:चा QR कोड, खात्यात जमा होऊ लागले लाखो रुपये, पण एका चुकीने सापडला
Temple Donation Box: आरोपीने चीनमधील एका विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. त्याने अनेक प्रांतातील बौद्ध मंदिरांमधून देणगीची रक्कम या पद्धतीने चोरली होती. देणगीसाठी ठेवलेला QR कोड बदलून आणि स्वतःचा QR कोड तयार करून लावत होता.
सध्या ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे. अगदी भाजी विक्रेत्यापासून मॉलपर्यंत सर्वत्र डिजिटल पेमेंट केले जात आहे. त्या व्यक्तीचा क्यूआर कोड स्कॅन केली अन् झाले पैसे जमा…हॉस्पिटलपासून मंदिरापर्यंत हिच प्रणाली लागू केली आहे. परंतु एका पठ्याने मंदिराच्या दानपेटीवर स्वत:चा क्यूआर कोड लावला. त्यानंतर त्याच्या खात्यात पैसे येऊ लागले. ही रक्कम लाखोंच्या घरात गेली. त्याने त्याच्या जीवनात कमाई केली नसेल इतकी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाली. परंतु अखेर तो सापडला. या घटनेची चर्चा सर्वत्र झाली. चीनमधील बौद्ध मंदिरात हा प्रकार घडला.
सीसीटीव्हीमुळे उघड झाला प्रकार
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, चीनच्या बाओजी शहरात ही घटना घडली. येथील बौद्ध फामेन मंदिरातील सीसीटीव्हीत क्यूआर कोड लावणारा भामटा कैद झाला आहे. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील क्लिपमध्ये तो इतर लोकांसह दानपेटीजवळ असलेल्या बुद्ध मूर्तीसमोर गुडघे टेकत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने मंदिराच्या QR कोडच्या वरच्या दानपेटीवर स्वतःचा QR कोड लावले. त्यानंतर त्या माणसाने हात जोडून तीन वेळा भगवान बुद्धाला नमस्कार केला आणि निघून गेला.
इतर मंदिरांमध्येही केली चोरी
क्यूआर कोड लावल्यानंतर त्याच्या खात्यात पैसे येऊ लागले. काही दिवस हा प्रकार सुरु होता. मंदिर प्रशासनाला त्या क्यूआर कोडसंदर्भात संशय आला. त्यांनी पोलिसांना हे प्रकरण सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी करुन त्या भामट्याला पकडले. त्याने याच पद्धतीचा वापर करून इतर प्रांतातील बौद्ध संस्थांमधून चोरी केल्याची कबुली दिली.तसेच त्याला जे पैसे मिळाले होते ते परत केले.
आरोपी कायद्याचा पदवीधर
आरोपीने चीनमधील एका विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. त्याने अनेक प्रांतातील बौद्ध मंदिरांमधून देणगीची रक्कम या पद्धतीने चोरली होती. देणगीसाठी ठेवलेला QR कोड बदलून आणि स्वतःचा QR कोड तयार करून लावत होता. त्याने यावर्षी सिचुआन आणि चोंगकिंग या नैऋत्य प्रांतातील मंदिरे आणि शानक्सी या वायव्य प्रांतातील मंदिरांमधून 30,000 युआन (सुमारे US$4,200) चोरले होते. त्याची किंमत भारतीय रुपयात मोजली तर ती साडेतीन किंवा चार लाख रुपये होते.