ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर शीर छाटलेला एक मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. ज्या कृतीने हत्या करण्यात आली होती हे पाहून पोलीस देखील आवक झाले. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला. गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या घटनेतील मृतक व्यक्तीचं नाव सोमनाथ सादगीर (वय-३५ वर्षे) असा असून तो या उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सोमनाथ सादगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना लक्षात आल्या. यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम याने सोमनाथ सदगीर याची हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत आरोपी प्रसाद कदम याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी प्रसादची चौकशी केली असता चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.
सुपरवायझर सोमनाथ याने कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता. तर सोमनाथ यांच्याकडून प्रसादने 8 हजार रुपये देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ याने प्रसादला आईवरून शिवी दिली होती. हा संताप प्रसादच्या डोक्यात असल्याने त्याने सोमनाथचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सीरिज पाहिल्या. हत्या कशा रितीने केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जातात, हत्यार कुठे लपवता येतात? या सगळ्या गोष्टींकरता प्रसादने वेब सीरिज पाहिल्या होत्या. त्यानंतर त्याने ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं तिथे त्याने आणलेल्या हत्याराने सोमनाथवर वार करायला सुरुवात केली.
सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादने त्याच्या गळ्यावर हत्यार फिरून त्याचं शीर छाटलं आणि घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट -५ च्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या अवाळ्या. प्रसादला क्राईम ब्रांच युनिट -५ ने कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. कापूरवाडी पोलिसांनी प्रसादला कोर्टात हजर केले असता त्याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. पोलिसांनी तपास केला असता प्राथमिक तपासात हत्येची ही धक्कादायक कारणे समोर आली आहेत. हत्या करण्याकरता वापरलेले हत्यार अजूनही हस्तगत झाले नसून या हत्याराच्या शोधात कापूरबावडी पोलीस आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.