घटस्फोटासाठी बायकोकडून एक कोटींची मागणी, व्हिडीओ शूट करत तरुणाची नदीत आत्महत्या
नर्मदा पुलावरुन उडी मारून अजय द्विवेदी याने आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह दोन दिवसांनी नदीत तरंगताना आढळून आला. मृत्यूपूर्वी शूट केलेल्या व्हिडीओत त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर घणाघाती आरोप केले आहेत.
भोपाळ : 40 फूट उंच पुलावरुन नर्मदा नदीत उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये सापडला आहे. त्याच्याजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून मृत्यूपूर्वी त्याने स्वतःचा व्हिडीओही शूट केला होता. घटस्फोट घेणाऱ्या पत्नीसह सासरच्या मंडळींनी आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा त्याने केला आहे. तरुणाच्या डेप्युटी रेंजर वडिलांनी सून आणि तिच्या माहेरच्या मंडळींवर मुलाला त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा मुख्यालयापासून 80 किमी अंतरावर असलेल्या बडवाह येथील नर्मदा पुलावरुन उडी मारून अजय द्विवेदी याने आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह मुरल्ला गावाजवळील नर्मदा नदीत तरंगताना आढळून आला.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील रेवा येथील रहिवासी असलेला अजय द्विवेदी गुरुवारी दुपारी आपल्या साथीदारासह इंदूरहून ओंकारेश्वरला स्कूटीने जात होता. यावेळी त्याने मध्येच थांबून नर्मदा पुलावरून उडी मारली. तीन दिवस त्याचा नदीपात्रात शोध सुरु होता. शनिवारी मुरल्ला नर्मदा नदीत एक मृतदेह तरंगताना पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह बाहेर काढल्यावर तो अजय द्विवेदीचे असल्याची ओळख पटली.
माहिती मिळताच अजयचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्याचे वडील प्रमोद द्विवेदी हे मुलाच्या मृतदेहाला कवटाळून रडायला लागले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी बडवाह शासकीय रुग्णालयात पाठवला.
सुसाईड नोटमध्ये काय?
मयत अजयच्या बाईकच्या डिकीत पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात अजयने लिहिले आहे की, माझ्या मृत्यूला गुरुप्रसाद तिवारी, प्रार्थना तिवारी, प्रिन्स तिवारी, रामा तिवारी जबाबदार आहेत. 3 वर्षांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खटला भरुन एक कोटी रुपयांची ते मागणी करत होते. त्यामुळे कंटाळून मी टोकाचं पाऊल उचलले आहे.
मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवून आरोप
अजय द्विवेदीने स्वत: व्हिडीओ बनवत माझ्या मृत्यूला प्रार्थना तिवारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. “3 वर्षांपासून माझ्या कुटुंबावर खटला सुरू आहे. माझ्या कुटुंबाची फारसा संबंध नसलेल्या माझ्या काकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. तीन वर्षांपासून खटला सुरू आहे. माझ्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी ते एक कोटी मागत आहेत. त्यांनी खूप प्लॅनिंग केले होते. कंटाळून मी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. न्यायालयाला माझी प्रार्थना आहे, की अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे” असं त्याने व्हिडीओत म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
लिफ्ट देण्याचा बहाणा, निर्जनस्थळी नेत महिलांची लूट, पुण्यातील भामटा अखेर जेरबंद
मृतदेह नेणारी गाडी ट्रकवर आदळली, भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर
ऑनलाईन ओळख, लग्नाच्या बेडीत अडकवून 8 दिवसात छूमंतर, नवरदेव कसा अडकला जाळ्यात?