तीन बेपत्ता मित्र तलावात 30 फूट खोल मृतावस्थेत, शेवटच्या क्षणी काय घडलं? एकही साक्षीदार नाही जिवंत
तिन्ही मुलं शनिवारी दुपारी शाळेतून परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे चौकात खेळायला गेली होती, असं तिघांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत मुलं घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली आणि ते लेकरांचा शोध घ्यायला घराबाहेर पडले.
भोपाळ : बेपत्ता झालेले तीन चिमुरडे मित्र तलावात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारपासून बेपत्ता झालेली 9, 10 आणि 13 वर्ष वयोगटातील तीन मुलं रविवारी मध्य प्रदेशातील शाजपूर जिल्ह्यातील तलावात मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं आहे. या धक्क्याने कालापिपल गावावर शोककळा पसरली आहे.
काय आहे प्रकरण?
तिन्ही मुलं शनिवारी दुपारी शाळेतून परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे चौकात खेळायला गेली होती, असं तिघांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत मुलं घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली आणि ते लेकरांचा शोध घ्यायला घराबाहेर पडले.
शोधाशोध करताना फक्त आपलंच मूल नाही, तर तिघंही मित्र बेपत्ता झाल्याचं तिन्ही कुटुंबांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिघांचाही एकत्रित शोध सुरु झाला. त्यांनी जवळपास शोध घेत शेवटी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला.
नेमकं काय घडलं?
कालापिपल पोलीस स्टेशन इन्चार्ज उदय सिंग अलवा यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री त्यांना हरवलेल्या मुलांबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसांची पथकं पाठवली. नैतिक (9 वर्ष), अभिषेक (10 वर्ष) आणि 13 वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. दोघं चौथीत, तर एक जण इयत्ता आठवीत शिकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रात्रभर शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
तलावाजवळ चपला आणि कपडे
त्याच वेळी स्थानिक नागरिकांना तलावाजवळ चपला आणि कपडे आढळले. हे पाहून सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कुटुंबीयांनी हे कपडे आपल्याच मुलांचे असल्याचं ओळखलं. तलावात शोध घेतल्यानंतर 30 फूट खोलवर गाळात त्यांचे मृतदेह रुतलेले आढळले.
शेवटच्या क्षणाचा एकही साक्षीदार जिवंत नाही
खेळताना तलावात पोहण्याचा मोह झाल्यामुळे तिघेही जण पाण्यात उतरल्याचा अंदाज आहे. मात्र पाय अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं, एका मित्राला वाचवण्याच्या नादात तिघेही बुडाले का, हे सांगायला त्यांच्यापैकी आता कोणीही जिवंत राहिलेलं नाही. ऑटोप्सीनंतर तिन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
शिवेसना पदाधिकाऱ्याचा कारनामा, स्वत:वर गोळीबार झाल्याचा रचला कट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण