शिर्डी (अहमदनगर) : रक्षाबंधनाच्या दिवशी मध्यप्रदेशची हरवलेली बहीण तिच्या भावांना साईबाबांच्या शिर्डीत सापडली आहे. मंदिर बंद असताना साईभक्तांना बाबांची आरती बघायला मिळावी यासाठी शिर्डीतील शिवसैनिक सुनिल परदेशी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे भावा-बहिणीची पुन्हा भेट झाली. गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी मध्यप्रदेश राज्यातील जुनाडदेव येथील 65 वर्षीय कांता निघलानी आपल्या दिनक्रमानुसार सकाळी फिरायला बाहेर पडल्या. मात्र त्या घरी परतल्याच नाही.
त्यांचे भाऊ बहिणीच्या प्रेमाने व्याकुळ झाले होते. बहिणीची शोधाशोध करुनही हाती निराशा आल्याने त्यांनी बहीण हरवल्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या कुठे गेल्या याचा काहीही थांगपत्ता घरच्यांना नव्हता. सर्वत्र शोधाशोध करुनही उपयोग होत नसल्याने सर्व हताश झाले होते. पण बहिणीची पुन्हा एकदा साईंबाबांच्या कृपेने भेट झाल्याने भावांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रु झळकले.
दरम्यान, शिर्डीतील साईमंदिर बंद असल्याने देशभरातील भाविकांना साईंचे दर्शन मिळावे यासाठी शिर्डीतील शिवसैनिक सुनिल परदेशी हे रोज काही वेळाचे व्हिडीओ काढून ते सोशल मिडीयावर टाकायचे. त्यांनी बुधवारी (15 सप्टेंबर) असाच एक व्हिडीओ काढला आणि दिल्लीच्या साईभक्तांच्या ग्रुपवर पाठवला. आजींच्या डोळ्यात अश्रू दाटलेला काकड आरतीचा हा व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आणि तो आजींच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला.
आजींच्या नातेवाईकांनी व्हिडीओ पाठवणाऱ्याचा शोध घेत ते सुनिल परदेशी यांच्या संपर्कात आले आणि परदेशी यांना फोन करुन त्यांनी सर्व घटना सांगितली. सुनिल परदेशी यांनी सदर महिलेचा साईमंदिर परिसरात शोध घेत तिला भेटून घरी नेले आणि त्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर तात्काळ आजीचे भाऊ स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने शिर्डीकडे मार्गस्थ झाले आणि आज या आजीची पुन्हा कुटुंबियांशी गाठ पडली.
सुनिल परदेशी यांनी काढलेल्या या व्हिडिओमुळे एका आजीला आपले कुटुंबीय पुन्हा परत मिळाले. एकीकडे सोशल मिडीयामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होताना दिसतात. तर सोशल मीडीयाचा असाही फायदा होवू शकतो हे सिद्ध झालंय.
कांता निघलानी या आपल्या एकुलता एक मुलगा असलेल्या अंशुमनकडे राहत होत्या. मात्र सून आणि मुलाकडून सुरु असलेल्या मानसिक आणि शारीरिक जाचाने त्या कंटाळल्या असल्याची माहिती भावांनी दिली. रक्षाबंधानाच्या दिवशी हरवलेल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता भावांनी घेतली असून मुलाकडे बहिणीला न पाठवता भाऊच आता तिचा सांभाळ करणार आहेत.
हेही वाचा :
अजिंठ्यातील सातकुंडात पडला मेडिकलचा विद्यार्थी, दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले
कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? राहुल गांधीसोबत गुप्त बैठका सुरु