भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस? शिवसेना आमदाराची भावजयीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा
भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस म्हणून भावजयीला मारहाण केल्याचा बोरणारे यांच्यावर आरोप होता. मारहाण प्रकरणी आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद : शिवसेना आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावजयीला मारहाण प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीच रमेश बोरणारे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होता. “भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस?” म्हणून भावजयीला मारहाण केल्याचा बोरणारे यांच्यावर आरोप होता. मारहाण प्रकरणी आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे. रमेश बोरणारे हे औरंगाबादमधील वैजापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत.
पीडित भावजयीचा आरोप काय?
फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे ती या कार्यक्रमाला गेली होती. दुसऱ्या दिवशी ती वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला गेली असता, तिथे आमदार रमेश बोरणारे यांच्याशी तिची भेट झाली. त्यावेळी, भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस, असा जाब विचारत बोरणारेंनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला होता. रस्त्यावर खाली पाडून लाथांनी मारल्याचा दावाही तिने केला होता.
पतीलाही मारहाण, महिलेचा दावा
माझ्या पतीलाही मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला होता. आमदार बोरणारे यांच्यासह त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनीही मारहाण केल्याचा असल्याचं महिलेने म्हटलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात वैजापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता विनयभंगाचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ट्यूशन चालकाला बेड्या
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक