नवरात्रासाठी मंदिरात बसलेली महिला अचानक ऊसाच्या शेतात गेली, दोन दिवसांनंतरही बेपत्ता
महिलेच्या कुटुंबीयांसह सर्वांनी शोध मोहीम सुरु केली. मात्र दुसरा दिवस उलटून गेल्यानंतरही महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही. बाजारभोगाव परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि कळे पोलिसांकडून महिलेचा शोध घेतला जात आहे.
कोल्हापूर : मंदिरात नवरात्रासाठी बसलेली महिला अचानक ऊसाच्या शेतात निघून गेली, मात्र दुसरा दिवस उलटल्यानंतरही ती परतलेली नाही. कोल्हापुरात घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगावपैकी मोताईवाडी येथील मोताईदेवी मंदिरात नवरात्र बसलेली महिला बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कोणालाही न सांगता मंदिरातून निघून गेली आहे. ग्रामस्थांकडून परिसरातील शेत शिवारात महिलेचा शोध सुरु आहे, मात्र महिलेचा शोध लागलेला नाही. या घटनेची कळे पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मंदिरातून ऊसाच्या शेतात
40 वर्षीय संपदा नारायण बने ही महिला मोताईवाडी येथील मोताईदेवीच्या मंदिरात इतर महिलांबरोबर नवरात्रीनिमित्त बसली बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ती समोरच असलेल्या ऊसाच्या शेतीकडे निघून गेली. सुरुवातीला मंदिरातील लोकांनी दुर्लक्ष केले, मात्र बराच वेळ उलटून गेला, तरी ती परत न आल्यामुळे संशय निर्माण झाला.
दोन दिवसांनंतरही शोध नाही
अखेरीस, महिलेच्या कुटुंबीयांसह सर्वांनी शोध मोहीम सुरु केली. मात्र दुसरा दिवस उलटून गेल्यानंतरही महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही. बाजारभोगाव परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि कळे पोलिसांकडून महिलेचा शोध घेतला जात आहे.
संबंधित बातम्या :
‘केईएम’मधून बेपत्ता वृद्ध कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सापडला, हॉस्पिटलच्याच शवागारात 15 दिवसांनी शोध