रत्नागिरी : गाडी पार्क करण्याच्या वादातून दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला (Tourists Attacked) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली हर्णै समुद्र किनाऱ्यावर ही घटना (Dapoli Ratnagiri Crime News) घडली. कार पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून पुण्यातील (Pune) दोन पर्यटकांवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले, तर कारची काच फोडण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले आहेत. मात्र या प्रकरणामुळे पर्यटकांच्या ग्रुपमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे
जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हॉटेल सुरलीचे भारत मुळ्ये आणि अन्य तीन संशयित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला आहे. प्रहार कोकण या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे. शुभम परदेशी (वय 29 वर्ष) आणि सूरज काळे (वय 25 वर्ष) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातून पाच पर्यटक हर्णे समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. रविवारी ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याच वेळी सुरली गार्डन जवळ एक इनोव्हा कार रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करा असे त्यांनी सांगितले.
आपल्याला गाडी बाजूला करायला सांगितल्याचा राग मनात धरुन पाठलाग करत टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यात शुभम परदेशी, सूरज काळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी या संशयित हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.