भ्रष्टाचार, गैरव्यवहारात महाराष्ट्र ठरले ‘नंबर वन’, काय सांगते आकडेवारी ?
महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत आहे. इथे एकत्र कुटूंब गुण्यागोविंदाने नांदते. पण, गुन्हेगारीच्या या आकडेवारीमुळे पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
मुंबई : देशभरात घडलेल्या विविध गुन्हेगारी घटनांची आकडेवारी समोर आली आहे. 2021 मध्ये देशभरात एकूण 60 लाख 96 हजार 310 गुन्हे नोंदवले गेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून, मानवी शरीरावर परिणाम करणारे गुन्हे, संपत्तीवरील वाद, महिलांवर, मुलांवर, अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर, ज्येष्ठ नागरिकांवर झालेल्या अत्याचार तसेच राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत आहे. इथे एकत्र कुटूंब गुण्यागोविंदाने नांदते. पण, गुन्हेगारीच्या या आकडेवारीमुळे पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
देशात एकूण 60 लाख 96 हजार 310 गुन्हे नोंदवले गेले. यात तामिळनाडूमध्ये 7 लाख 56 हजार 753, गुजरातमध्ये 7 लाख 31 हजार 738, उत्तर प्रदेशमध्ये 6 लाख 8 हजार 82, तर महाराष्ट्रात 5 लाख 40 हजार 800 इतके गुन्हे दाखल झाले आहेत. या यादीत महाराष्ट्र 4 थ्या क्रमांकावर आहे.
या गुन्ह्यात महाराष्ट्र नंबर वन
देशात ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचाराचे 26 हजार 110 गुन्हे नोंदवले त्यापैकी राज्यात सर्वात जास्त 6 हजार 190 गुन्हे नोंदविले गेले आहेत.
देशात संपत्तीवरील वादाचे 7 लाख 66 हजार 657 गुन्हे घडले असून त्यापैकी सर्वात जास्त गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यांची संख्या 91 हजार 842 इतकी आहे.
भ्रष्टाचार व गैरव्यवहार यातही महाराष्ट्र मागे नाही. देशभरातील 3 हजार 745 इतक्या गुन्ह्यांपैकी महाराष्ट्रात 773 गुन्हे नोंदविले गेले असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
मुलांवरील अत्याचारात नंबर दोन
देशात मुलांवरील अत्याचाराचे 1 लाख 49 हजार 404 गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये 19 हजार 173 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 17 हजार 261 इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
महिलांवरील अत्याचारातही वाढ
भारतात महिलांवरील अत्याचार होण्याच्या एकूण 4 लाख 28 हजार 278 प्रकरणे नोंद झाली आहेत. यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 56 हजार 83, राजस्थानमध्ये 40 हजार 738 तर महाराष्ट्र 39 हजार 526 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
तर, देशात 30 हजार 132 खुनाचे गुन्हे नोंदविले असून त्यापैकी सर्वात जास्त उत्तर प्रदेश 3 हजार, बिहार 2 हजार 826 आणि त्यानंतर महाराष्ट्र 2 हजार 381 खुनाची प्रकरणे नोंदविली गेली आहेत.
अनुसूचित जमातीवरील अत्याचार करण्याठी महाराष्ट्र मागे नाही. देशात या गुन्ह्याचे 8 हजार 802 गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी मध्य प्रदेशात 2 हजार 627, राजस्थान 2 हजार 121 आणि महाराष्ट्रात 628 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
आर्थिक गुन्हेगारीही कमी नाहीच
आर्थिक गुन्हेगारीची 1 लाख 74 हजार 13 प्रकरणे देशात नोंदविली गेली. त्यापैकी सर्वात जास्त राजस्थान ( 23 हजार 757 ), तेलंगणा ( 20 हजार 759 ), उत्तर प्रदेश ( 20 हजार 26 ) तर महाराष्ट्र ( 15 हजार 550 ) प्रकरणे दाखल झाली आहेत.
देशात 52 हजार 974 सायबर क्राईम गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात तेलंगणा राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तेलंगणा ( 10 हजार 303 ), उत्तर प्रदेश ( 8 हजार 829 ), कर्नाटक ( 8 हजार 136 ) आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 5 हजार 562 ) गुन्हे नोंद आहेत.
मानवी शरीरावर परिणाम करणारे 11 लाख 55 हजार 942 गुन्हे घडले. यात उत्तर प्रदेश ( 1 लाख 39 हजार 952 ), मध्य प्रदेश ( 1 लाख 33 हजार 984 ), बिहार ( 1 लाख 25 हजार 127 ) तर महाराष्ट्रात 1 लाख 577 गुन्हे घडले आहेत.
राज्याविरोधात कारवाईमध्ये भारतात एकूण 5 हजार 164 गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश ( 1 हजार 862 ) तामिळनाडू ( 654 ), आसाम ( 327 ), जम्मु आणि काश्मीर ( 313 ), पश्चिम बंगाल ( 274 ) आणि 6 व्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 218 ) गुन्ह्यांची नोंद झाली आहे.