आणखी एका लिव्ह इन पार्टनरची क्रूर हत्या, प्रेयसीचे अवयव भिंतीतच गाडले, 9 वर्षानंतर खुलासा; काय आहे प्रकरण?
मुंबईच्या मीरारोड सारखीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माद्रीद : मुंबईत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने आपल्या पार्टनरची अत्यंत क्रूर हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने संपूर्ण हादरून गेले आहेत. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भिंतीत गाडले. त्यानंतर तो निर्धास्त होता. अखेर 9 वर्षानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्याने खुनाची कबुली दिली. त्याने जे सांगितलं त्याने संपूर्ण पोलीस यंत्रणाच हादरून गेली आहे.
स्पेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 22 वर्षाची महिला बेपत्ता झाली होती. नऊ वर्षानंतर तिच्या शरीराचे आवशेष दोन भिंतीत गाडलेले सापडले. तिच्याच फ्लॅटमध्ये तिच्या मृतदेहाचे आवशेष सापडले. सिबोरा गगनी असं या पीडित तरुणीचं नाव आहे. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अचानक गायब झाली होती. पोलिसांनी तिचा प्रचंड शोध घेतला. पण काहीच हाती लागले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अखेर वैतागून चौकशी बंद केली होती.
फोटो पाहून गुन्हा कबूल केला
दरम्यान, पॉला नावाच्या एका महिलेची हत्या झाली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या महिन्यात एका आरोपीला अटक केली होती. त्यावेळी त्याने सिबोराच्या हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक खुनाचा उलगडा झाला. आरोपीचं नाव मार्को गियाओ रोमियो असं आहे. तो 45 वर्षाचा आहे. त्याने पोलीस ठाण्यात सिबोराचा फोटो पाहून आपला गुन्हा कबूल केला. त्याने सिबोराच्या मृतदेहावर अॅसिड टाकलं होतं. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने असं केलं होतं. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा ही केस उघडली.
एका मुलाचा बाप
पोलिसांनी पॉला नावाच्या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणी मार्कोला 17 मे रोजी अटक केली होती. पॉला ही 28 वर्षाची इटलीतील राहणारी तरुणी होती. मार्कोला पॉलाच्या घरी येताना आणि जाताना पाहण्यात आलं होतं. मार्कोने तिच्यावर कथितरित्या चाकूचे वार केले होते. 17 वेळा त्याने तिला भोसकले होते. पॉलाला तीन मुलं आहेत. त्यापैकी मार्को यातील एका मुलाचा बाप आहे. मार्कोने पॉलाच्या हत्येची कबुली दिलीच. पण पोलीस स्टेशनमधील सिबोराचा फोटो पाहून तिच्या हत्येचीही कबुली दिली. 7 जुलै 2004 रोजी सिबोला गायब झाली होती. सिबोराच्या मृतदेहावर अॅसिड टाकल्यानंतर एका बॉक्समध्ये तिचा मृतदेह भरून भिंतीत हा बॉक्स गाडला होता.
भिंतीत बॉक्स सापडले
त्याच्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिबोराच्या घराचा कसून तपास केला असता तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी भिंतीत एक बॉक्स सपाडला. त्यात सिबोराच्या मृतदेहाचे तुकडे पिशव्यांमध्ये ठेवले होते. त्यावर एक फुलांचा गुच्छही होता. पोलिसांनी हे तुकडे प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या मृतदेहांचा डीएनए रिपोर्ट अजून आलेला नाही. दरम्यान, या फ्लॅटमध्ये आता भाडेकरू राहत असून ते पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत आहेत.