बायकोच्या तोंडून पीएम मोदी, योगींच कौतुक सहन झालं नाही, अयोध्येत मुस्लिम महिलेसोबत काय घडलं?
अयोध्येत मुस्लिम कुटुंबात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायको पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करायची. पण नवऱ्याला हे सहन झालं नाही. सासरकडच्या मंडळींनी या महिलेला कशी वागणूक दिली? या कुटुंबात काय घडलं? जाणून घ्या.
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारच कौतुक केलं म्हणून नवऱ्याने आपल्याला ट्रिपल तलाक दिला असा आरोप एका 19 वर्षीय विवाहित महिलेने केला आहे. सासू, नवरा आणि घरातील अन्य सदस्यांनी आपल्याला भरपूर त्रास दिला असा आरोप सुद्धा या महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांना नवरा अर्शद, त्याचे दोन भाऊ फरहान आणि शफाफ, वहिनी सिमरन, सासू रईसा आणि सासरे इस्लाम यांच्याविरुद्ध FIR नोंदवला आहे. या सर्व आरोपीना अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील हे प्रकरण आहे.
बहाराईच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितलं की, बहराईच येथे राहणाऱ्या मरियम शरीफचा अयोध्येत राहणाऱ्या अर्शद सोबत डिसेंबर महिन्यात निकाह झाला. अयोध्येत पीएम मोदी आणि सीएम योगी यांनी केलेल्या विकास कामांच मी जेव्हा कौतुक करायचे, तेव्हा नवरा माझ्यावर वैतागायचा, चिडायचा असा आरोप मरियमने केला आहे. अर्शदने मरियमला सर्वप्रथम तिच्या आई-वडिलांच्या घरी पाठवलं. नवऱ्याने एकदा आपल्या अंगावर गरम डाळ फेकली होती, असा आरोपही तिने केलाय.
पुन्हा अयोध्येत घेऊन आला
निकाह होऊन सासरी आले. त्यानंतर नवऱ्याने एकदा मला अयोध्येमध्ये फिरवलं. तिथला विकास, परिवर्तन पाहून मी प्रभावित झाले, असं मरियमने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. मी म्हटलं योगीजी आणि मोदींजींनी अयोध्येत खूप चांगलं काम केलय. ते माझ्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना आवडलं नाही. त्यांनी मला शिवीगाळ केली व मारहाण केली असं तिने तक्रारीत नमूद केलय. ही घटना जुलैच्या अखेरीस घडली. त्यानंतर अर्शदने मरियमला तिच्या आई-वडिलांकडे पाठवून दिलं. दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर अर्शद ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मरियमला पुन्हा अयोध्येत घेऊन आला.
त्याने माझ्या अंगावर गरम डाळ फेकली
5 ऑगस्टला नवऱ्याने पीएम मोदी आणि सीएम योगींबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर तीन वेळा तलाक, तलाक, तलाक बोलला. माझ्यासाठी हा धक्का होता. माझ्या सासूने आणि दीराने मध्ये हस्तक्षेप करुन मला मारहाण केली. नवऱ्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने माझ्या अंगावर गरम डाळ फेकली असा आरोप मरियमने केला आहे.