नाशिकः छळ करून पत्नीचा 1 कोटीचा ऐवज हडपल्याचा गुन्हा नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या विवाहितेचे मुंबईच्या जुहू परिसरात राहणाऱ्या क्षितिज शिशिर बेथारिया (वय 32) याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर सासरच्या लोकांनी विवाहितेचा माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यासाठी मारहाण आणि शिविगाळ केली. शिवाय संयुक्त बचत खात्यातून विवाहितेची परवानगी न घेता परस्पर रक्कम काढली. तिच्या वडिलांनी लग्नात दिलेली स्त्रीधन, संसारोपयोगी वस्तू असा तब्बल 1 कोटीचा ऐवज सासरच्या मंडळींनी हडप केला, अशी तक्रार विवाहितेने दिली असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पती क्षितिज शिशीर बेथारिया, सासरे शिशीर श्यामलाल बेथारिया, सासू पल्लवी बेथारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा छळ
विवाहिता छळाबाबत दुसरी तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्याचे शुभम भरेकर, संगीता भरेकर, किशोर भरेकर यांच्यावर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या विवाहितेचे पुण्याच्या शुभम भरेकरसोबत लग्न झाले होते. तिच्या वडिलांनी रिसॉर्टमध्ये लग्न लावून दिले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी त्रास दिला, मारहाण केली, शिवीगाळ केली सोबतच चारचाकी खरेदी करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
महिलेचे दोन लाख लंपास
बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. रेहाना रफिक शेख (वय 55, रा. शिवाजीरोड, शालिमार) या आपल्या पतीसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास जवळपास दोन लाखांची रक्कम बँकेतून काढली. त्यांनी हे पैसे आपल्याजवळच्या पिशवीत ठेवले. दोघेही बँकेतून बाहेर पडताच मोटारसायकलवर आलेले चोरटे रेहाना यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पसार झाले. शेख दाम्पत्याने चोर, चोर अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रेहाना शेख यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्याः
साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!
सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या
This Week Releasing : OTTवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक चित्रपट, जाणून घ्या कोणता चित्रपट कुठे पाहाल?#OTT | #Entertainment https://t.co/D73nIEavEB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021