भिवंडी : पॅरोलवर सुटून आलेल्या एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 37 वर्षीय महिलेने दहा महिन्यांपूर्वी आपल्यावर विनयभंग आणि बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी खालिद उर्फ गुड्डू मुख्तार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. (MIM Bhiwandi Chief on Parole arrested in Rape Case)
बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर पुन्हा अटक
23 सप्टेंबर 2020 रोजी खंडणीच्या तब्बल आठ गुन्ह्यात अटक असलेले एमआयएम पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष खालिद उर्फ गुड्डू मुख्तार शेख सध्या पॅरोलवर घरी आले आहेत. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नव्याने बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे खालिद गुड्डू समर्थक कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ समर्थक शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिले होते. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
दहा दिवसांत नऊ गुन्हे
एमआयएम पक्षाचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यावर 23 सप्टेंबर रोजी खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत खंडणीचे आठ, बलात्काराचा एक अशा प्रकारचे एकूण नऊ गुन्हे दाखल झाले होते. या सर्व गुन्ह्यात खालिद गुड्डू यांना अटक झाली होती. दरम्यानच्या काळात कोरोना परिस्थितीत त्यांना 45 दिवसांच्या पॅरोलवर घरी सोडण्यात आले, मात्र नजीकच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट त्यांना घातली होती.
जामिनावरील सुनावणीपूर्वी नवा गुन्हा
दरम्यान, त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 23 जून रोजी सुनावणी होणार असताना शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात खालिद गुड्डू विरोधात एका महिलेने दहा महिन्यांपूर्वी विनयभंग आणि बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आलेल्या खालिद गुड्डू यांना पुन्हा अटक केली आहे.
कुटुंबियांसह समर्थक कार्यकर्त्यांमधून संताप
पोलीस जाणीवपूर्वक खालिद गुड्डू यांच्यावर राजकीय आकसापोटी करवाई करून खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप अॅड अमोल कांबळे यांनी केला आहे. पोलीस राजकीय दबावापोटी काम करत असून याविरोधात येत्या काळात न्यायालयात दाद मागणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या अटकेविरोधात कुटुंबियांसह समर्थक कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी सायंकाळी शेकडो समर्थकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर एकत्रित होत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
दहा महिन्यांपूर्वी खालिद गुड्डू यांनी शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप 37 वर्षीय महिलेने केल्यानंतर संबंधित शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची शहानिशा करून आरोपी खालिद गुड्डू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले
(MIM Bhiwandi Chief on Parole arrested in Rape Case)