बेपत्ता होणाऱ्या बालकांमध्ये 75 टक्के मुली, NCRBच्या अहवालातील राज्यनिहाय आकडेवारी काय?
देशभरातून बेपत्ता होणाऱ्या बालकांची आकडेवारी वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, 2021 साली 77 हजार 535 मुलं बेपत्ता झाली होती. त्यामध्ये दर 4 पैकी 3 मुली होत्या.
नवी दिल्ली: गेल्या काही काळामध्ये देशभरात उत्तर प्रदेशसह (Uttar pradesh) काही राज्यातून लहान मुलं चोरली जाण्याचे किंवा ते बेपत्ता होण्याचे (child trafficking and child missing) अनेक प्रकार समोर आले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालामध्येही बेपत्ता निरपराध मुलांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आकड्यांनुसार, 2021 या वर्षात देशात एकूण 77 हजार 535 मुले बेपत्ता झाली आहेत, त्यापैकी 75 टक्के मुली आहेत. देशातील हरवलेल्या मुलांशी संबंधित आकडेवारी धक्कादायक आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालानुसार बेपत्ता झालेल्या प्रत्येकी 4 मुलांमध्ये 3 मुली होत्या, म्हणजे त्यांचे प्रमाण 75 टक्के इतके आहे.
गेल्या 5 वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलांच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास दरवर्षी हा आकडा वाढत आहे. 2017 साली 63 हजार 349, तर 2018 साली 67 हजार 134 मुलं बेपत्ता झाली होती. 2019 साली बेपत्ता मुलांची संख्या 73 हजार 138 होती. 2020 साली हा आकडा थोडा कमी, 59 हजार 262 इतका होता. मात्र 2021 साली बेपत्ता मुलांची संख्या 77 हजार 535 इतकी होती.
मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली आणि राजस्थान ही अशी राज्ये आहेत, जिथे मुले बेपत्ता होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. मध्यप्रदेशमध्ये 11,607 तर पश्चिम बंगाल 9906, तामिळनाडू 6399, दिल्लीमध्ये 5772 मुलं तर राजस्थामध्ये 4936 मुलं बेपत्ता झाली आहेत.
पॉंडिचेरी, नागालॅंड, अंदमान- निकोबार, दीव-दमण आणि गोवा या राज्यांमध्ये 2021 मध्ये सर्वात कमी हरवलेल्या मुलांची नोंद झाली आहे. गोव्यामध्ये 13, दीव-दमण 19, अंदमान-निकोबार 25, नागालँडमध्ये 26 तर पॉंडिचेरीमध्ये 35 मुलं 2021 साली बेपत्ता आहेत.
ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये सर्वाधिक बेपत्ता मुलींची नोंद झाली आहे. ओदिशामध्ये 3656 (84.86 टक्के) मुली तर 477 मुलं बेपत्ता झाली. छत्तीसगडमध्ये 2865 (87.4 टक्के) मुली तर 413 मुलं बेपत्ता आहेत. पश्चिम बंगालमध्ये 8478 मुली( 84.81टक्के) तर 1518 मुलं, बिहारमध्ये 3870 मुली (84.53 टक्के) व 708 मुलं बेपत्ता झाली. तर पंजाबमधील 881 मुली (84.31 टक्के) आणि 164 मुलं बेपत्ता आहेत.