पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून देवाघरी जायचा निर्णय; माय-लेकीचा गळफास, चुटपूट लावणारी सुसाईड नोट
आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेच्या गर्तेत गेलेल्या सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली.
नाशिकः लहान मुलगी अनया सतत विचारायची, आई पप्पा कधी येणार? तिच्यासाठी आईकडे उत्तर नसायचं. अखेर आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेच्या गर्तेत गेलेल्या सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली.
कोरोनानं अनेक प्रकारे छळलं. त्यानं कोणाला अर्ध्यातनं उठवून नेलं, तर कोणाला मृत्यूला जवळ करायला भाग पाडलं. असंच काहीसं नाशिकमध्ये घडलंय. त्या तिघांचं हसतं-खेळतं कुटुंब. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आणि ते क्षणार्धात विखुरलं गेलं. सुजाता यांच्या पतीला कोरोना झाला. त्यात त्यांचं आजारपण, कुटुंबाची ओढाताण सुरू झाली. सुजातांनी मुलगी अनयाला सोबत घेऊन मोठ्या धीरानं या परिस्थितीलाही तोंड दिलं. मात्र, इतकं करूनही घरातला कर्ता पुरुष वाचलाच नाही. तेव्हापासून घराचे वासे फिरले, ते फिरलेच. आर्थिक विवंचना सुरू झाली. सुजाता नैराश्याच्या खोल गर्तेत गेल्या. तर मुलगी अनया त्यांना सतत पप्पा कधी येणार हे विचारायची. त्यांनी मुलीला ना-ना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला ते समजलं नाही. सुजातांच्या मनानंही ते नीटसं स्वीकारलं नाही. यामुळं त्या मनानं अजून खचल्या. त्यातूनचं त्यांनी चुटपूट लावणारी सुसाईड नोट लिहून ठेवली. देवाघरून पप्पा येत नाहीत, म्हणून देवाघरी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या अनयासह या जगाचा निरोप घेतला. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेनं नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरीही रोखता येतील आत्महत्या…
कोरोनाकाळात आणि विशेषतः लॉकडाऊनमुळे देशात आत्महत्यांच्या घटना वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तरी या घटना रोखल्या जाऊ शकतात, असं डॉ. रचना आवत्रमणी यांनी म्हटलं आहे. या घटना रोखल्या जाऊ शकतात. फक्त आत्महत्या करणाऱ्यांना केवळ तीन गोष्टी सांगा. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्यासाठी इथे आहे. तुझ्यासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे, हे मी जाणतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती आत्महत्या का करत आहे त्या कारणाचा शोध घ्या आणि त्याला एखाद्या तज्ज्ञाला दाखवा. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला या कठिण परिस्थितीत त्याच्यासोबत आहात हे सांगता किंवा त्यांचं दु:ख, वेदना, मनोदशा तुम्ही समजू शकता याची त्याला जाणीव करून देता तेव्हा त्या व्यक्तिच्या मनातील आत्महत्येचे विचार निघून जातात. असे केल्यास भारतात आत्महत्येच्या केसेसमध्ये घट होईल, असं आवत्रमणी यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्याः
भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर
(Mother and daughter commit suicide in Nashik; A disturbing suicide note)