Salman Khan : सौरव महाकाळची मुंबई क्राइम ब्रांचकडून चौकशी; सलमान खानला आलेल्या धमकीनंतर पथक पुण्यात
मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपींची नावे समोर आली होती. यापैकी दोन पुण्यातील असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सौरव महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांचा मुसेवाला हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याप्रकरणी एक आरोपी असलेल्या सौरव महाकाळ याची मुंबई क्राइम ब्रांच पुण्यात चौकशी करत आहे. अभिनेता सलमान खान याला धमकीचे पत्र आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांच महाकाळची चौकशी करत आहे. मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोक्का (Mocca) लावत सौरव उर्फ सिद्धेश उर्फ महाकाल हिरामण कांबळे याला काल अटक केली होती. मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपींची नावे समोर आली होती. यापैकी दोन पुण्यातील असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सौरव महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांचा मुसेवाला हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस या दोघांच्याही मागावर होते. त्यापैकी सौरव महाकाळला काल पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मोक्का अंतर्गत अटक केली होती. आज मुंबई क्राइम ब्रांच त्याची चौकशी करत आहे.
कोण आहे सौरव महाकाळ?
सौरभ महाकाळ हा संतोष यादव गँगचा सदस्य आहे. संतोष यादववर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. महाकाल हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंधित असून त्याच्यावर राजस्थानमध्येही काही गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्स बिश्नोई 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत असून आता पंजाब पोलीस त्याचीही चौकशी करणार आहेत. सौरव महाकाळ तसेच पुण्यातीलच संतोष जाधव या दोघांनी इतर साथीदारांसह मुसेवालावर गोळीबार केला होता. दरम्यान, सौरव महाकाळच्या अटकेबाबत पुणे पोलिसांकडून पंजाब पोलिसांना माहिती कळवण्यात आली आहे.
हत्येत सहभाग नाही, मात्र…
आरोपी महाकाल याचा मुसेवाला खुनात सहभाग नव्हता. मात्र, खून करणाऱ्या शूटरशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते, अशी माहिती स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. त्यांनी एकत्र अनेक खूनदेखील केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ते म्हणाले. सध्या तरी त्याचा मुसेवाला हत्येत प्रत्यक्ष सहभाग नव्हता, असे तपासात स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सलमान खानला धमकीचे पत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांचचे पथक पुण्यात दाखल झाले आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण काय?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मेला भरदिवसा हत्या करण्यात आली. मुसेवालाची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी होती. त्यानंतर त्याचा चाहता बनून काहीजणांनी त्याच्या घराची रेकी केली होती. दुसरीकडे मुसेवालाचे सुरक्षा रक्षक कमी करून ते दोनवर आणण्यात आले होते. याचीही माहिती आरोपींनी घेतली. त्यानंतरच त्याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या फायरिंगमध्ये मारेकऱ्यांनी मुसेवालाच्या शरीराची चाळण केली होती. त्याच्यावर सुमारे दोन डझनभर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारनंतर पंजाबमधील मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.