शातिर चोरांचा खिडकी तोडून सोन्याचे कॉईन, दागिन्यावर डल्ला; ‘या’ वर्दळीच्या शहरात घडली घटना
या वेळी एक सीसीटीव्हीत हे चोर कैद झाल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी हाजीमलंग रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली: कुटुंबातील लोक घर बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून दोन चोरट्यांनी डोंबिवलीतील एका घरात घरफोडी केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. या चोरट्यांनी खिडकीचे तावदान पहारीने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दागिने, सोन्याचे कॉईन पळवले. जाताना मोटारसायकलही घेऊन गेले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (police) तात्काळ शोधाशोध सुरू केली. सीसीटीव्ही (cctv) कॅमेरे पाहून चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (fir) केला असून अधिक तपास सुरू आहे.
डोंबिवलीत एका बंद घरावर डल्ला मारून चोरट्याने घरातील सोन्याचे कॉइन व दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोरट्यांपैकी एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे विष्णू नगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत हाजीमलंग रोड परिसरातून दोन आरोपीना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून 4 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विष्णू भांडेकर आणि शंकर पवार अशी या आरोपींची नावे आहेत.
21 सप्टेंबरला डोंबिवली पश्चिमेकडील अरुणोदय सोसायटीमध्ये राहणारे प्रकाश शिंपी हे कुटूंबासोबत खरेदीसाठी दादरला गेले होते. संध्याकाळच्या सुमारास घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला व ग्रील देखील तुटल्याचे आढळून आले.
त्यामुळे शिंपी कुटुंबांनी घरात शोधाशोध केली असता कपाटातील सोन्याचे कॉईन, दागिने, रोख रक्कम असा सुमारे 9 लाखाचा मुद्देमाल दिवसा ढवळ्या चोरट्यानी चोरून नेल्याचेत्यांच्या लक्षात आले.
या चोरीची त्यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याच्या तक्रारी नंतर डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक टीम बनण्यात आली. त्यानंतर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
या वेळी एक सीसीटीव्हीत हे चोर कैद झाल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी हाजीमलंग रोड परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना मिळाली.
त्यानंतर विष्णूनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय मोरे पोलीस शिपाई कुंदन भामरे, जमादार कांगुने याच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचत आरोपी विष्णू भांडेकर आणि शंकर पवार या दोघांना अटक केली.
तसेच पोलिसांनी आरोपींनकडून 90 हजार किंमतीची मोटारसायकल, 3 लाख 42 हजार किंमतीचे 132 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच 39 हजार रोख रक्कम असा एकूण 4 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांच्या माहिती नुसार, हे आरोपी चालता फिरता बंद घरावर नजर ठेवत. त्या घरच्या किचनची खिडकी पहारीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करत. घरातील सोन्याचे दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू घेऊन फरार होत होते.
सध्या या दोघांनी किती चोऱ्या केल्या व याचे साथीदार कोण आहेत? याचा तपास करत आहोत, अशी माहिती विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.