21 वर्षाच्या तरुणाची काहीच चूक नव्हती, मकरसंक्रांतीच्या दिवशीच मुंबईत सुन्न करणारी घटना
मुंबईच्या बोरीवली परिसरात उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका तरुणासोबत अनपेक्षित अशी घटना घडली आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे देशभरात आज मकरसंक्रातीचा उत्साह आहे. असं असताना आज बोरीवलीत घडलेल्या या घटनेमुळे मुंबई हादरली आहे.
मुंबई | 15 जानेवारी 2024 : राज्य आणि देशभरात मकरसंक्रांती सणाचा उत्साह आहे. तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन बोलत आहेत. घरोघरी नातेवाईक एकमेकांकडे जात आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये मकरसंक्रांतीच्या वेळी आकाशात पतंग उडवण्याचा ट्रेंड असतो. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मकरसंक्रांतीला पतंग उडवले जाते. पण या उत्साहाच्या वातावरणाला काही ठिकाणी पतंग उडवण्याच्या मांजामुळे गालबोट लागले आहे. मांजाने गळा कापून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलावर घडली आहे.
बोरीवलीत मांजाने गळा कापून 21 वर्षीय तरुणाचा म्रूत्यू झाला आहे. मोहम्मद फारुकी असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मोहम्मद फारुकी दुचाकीवरून जात असताना त्यांचा मांजाने गळा कापला गेला. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी पतंग उडवणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 304 (अ) (निष्काळजीपणे म्रूत्यू) नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
वसई विरारमध्ये 18 कबुतर जखमी
दरम्यान, पतंगाच्या नायलॉनच्या मांज्याने वसई विरारमध्ये 18 कबुतर जखमी झाले आहेत. विरारच्या करुणा ट्रस्टचे मितेश जैन यांनी मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करून, झाडावर, विजेच्या खांबावर तुटून पडलेल्या नायलॉनच्या मांज्यात अडकलेल्या 18 कबुतरांना जखमी अवस्थेत रेस्क्यू करून, त्यांच्यावर उपचार केले आहेत. मात्र यातील 3 कबुतरांचा मृत्यू झाला. तर 3 कबुतरांवर यशस्वी उपचार करून त्यांना सोडले आहे. तर इतर कबुतरवर उपचार सुरू आहेत.
मांजाने गळा कापला, हैदराबादमधील धक्कादायक घटना
दरम्यान, हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये चिनी मांजाने गळा कापल्याने भारतीय सैन्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. नाईक कागीथला कोटेश्वर रेड्डी असं या 30 वर्षीय जवानाचं नाव आहे. मांजाने गळा कापल्याने हा जवान गंभीर जखमी झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मध्य प्रदेशातही याच घटनेची पुनरावृत्ती
विशेष म्हणजे मध्य प्रदेशातही अशीच घटना समोर आली आहे. सात वर्षाचा बालक आपल्या आई-वडिलांसह बाईकने जात होता. यावेळी एका चौकावर पतंगाच्या मांजाने त्याचा गळा कापला गेला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर चिमुकल्याच्या आई-वडिलांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. संबंधित घटनेची दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.