रात्री घरुन गेला तो परतलाच नाही, सकाळी बसमध्ये आढळला मृतदेह
मयत तरुण हा मोबाईल न घेता रात्री घरातून निघून गेला होता. तरुणाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई : पार्किंग केलेल्या एका खाजगी शाळेच्या बसमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिम रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गणेश संजय भालेराव असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाचे वय अंदाजे 30 ते 31 वर्षे आहे.
मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी शाळेच्या बस पार्किंगमध्ये तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरुण हा माटुंगा लेबर कॅम्प शाहू नगर परिसरातील रहिवासी आहे.
सकाळी चालक बस घेण्यासाठी आला असता घटना उघड
आज सकाळी बस चालक पार्किंगमधून बस बाहेर काढण्यासाठी गेला असता, त्याला खाली रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला दिसला. चाकूने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आली होती.
पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत
बसचालकाने माहिम पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच माहिम पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पीएमसाठी सायन रुग्णालयात पाठवला. सध्या पोलीस घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी सांगितले की, मयत तरुण हा मोबाईल न घेता रात्री घरातून निघून गेला होता. तरुणाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.
उल्हासनगरमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणावर चाकूहल्ला
नाचताना धक्का मारु नको सांगितले म्हणून एका माथेफिरुन तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या पोटात चाकू खुपल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.