मुंबई : नवी मुंबईतील खारघर स्थित थ्री स्टार हॉटेलमधून तब्बल 25 लाखांचे बिल बुडवून एक भामटा चक्क बाथरुमच्या खिडकीतून मुलाला घेऊन पळून गेला. संबधित भामट्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुरली मुरुगेश कामत असे त्या भामट्याचे नाव आहे. तो मरोळ-अंधेरी येथे राहणारा आहे. तो मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्याचा बारा वर्षाच्या मुलासह हॉटेलमध्ये आला होता. या भामट्याने तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हिएफएक्स आणि अॅनिमेशनचे काम करतो, असे सांगून लवकरच स्वतःचे काम सुरु होणार असल्याची माहिती हॉटेल मालक संतोष शेट्टी यांना दिली होती. तसेच, सध्या पैसे नसल्याचे सांगत एक महिन्यानंतर पैसे देतो, असे सांगत मुरली कामत याने त्याचा पासपोर्ट हॉटेल व्यवस्थापनाकडे जमा केला होता.
हॉटेल मालक संतोष शेट्टी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मुरली कामत याने स्वतःसाठी आणि मुलाला राहण्यासाठी एक सुपर डीलक्स रुम बुक केला. तसेच मीटिंगसाठी दुसरा डीलक्स रुम बुक केला. त्यानंतर मुरली कामत या व्यक्तीला इतर लोक हॉटेलमध्ये भेटण्यासाठी येत असत. महिना झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने मुरली याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, नंतर पैसे देतो सांगून तो वेळ मारुन नेत होता. त्यानंतरही हॉटेल व्यवस्थापनाने वारंवार बिलाची मागणी केली. मात्र, मुरली कामत काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत असे.
फेब्रुवारी महिन्यात मुरलीने तीन नाव नसलेले चेक सही करुन दिले. मात्र, ते चेक बँकेत जमा करण्यास हॉटेल स्टाफने विचारणा केली असता तो तारखेवर तारीख देत असे. ज्यावेळी या मुरली कामतकडे बाहेरचे लोक हॉटेलमध्ये पैसे मागण्यास येऊ लागले त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकाच्या कामत हा फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लवकरात लवकर रक्कम जमा करावी, असे हॉटेल व्यवस्थापनाने मुरली कामत याला सांगितले.
मुरली ज्यादिवशी पळाला त्यादिवशी त्याने हॉटेलचे आणि रेस्टॉरंट्सचे बिल हे त्याच्या मेल आयडीवर मेल करण्यास सांगितले. मात्र काही वेळातच त्याने मुलासह हॉटेलच्या खिडकीतून पलायन केले. त्यापूर्वी कामत याने काही औषधे मागवली होती. ती औषधे घेऊन हॉटेल कर्मचारी मुरलीने बुक केलेल्या सुपर डीलक्स रुमकडे गेला. त्याने अर्धा तास मुरलीच्या रुमची बेल वाजवली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या चावीने रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी मुरली त्याच्या मुलासह रुममध्ये नसल्याचे निदर्शनास आले. त्याने रुममध्ये लॅपटॉप, मोबाईल सोडून पळ काढला आहे.
यापूर्वी आरोपी मुरली याने मुंबई येथील रॉयल हॉटेलमध्ये हा प्रकार केला होता. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली होती. सिनेमा बनवायचा आहे, महागड्या गाड्या आणि हॉटेलचे काही सीन शूट करावे लागतील, असे देखील सांगून तो हॉटेल मालकांना फसवत आहे.
हेही वाचा :
चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी, आरोपींची ‘टॅलेंटगिरी’ ‘चतूर’ पोलिसांनी उघडी पाडली