गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, ‘या’ आरोपीचं आत्मसमर्पण
आमदार गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणी फरार असलेल्या विकी गणात्राने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे आत्मसमर्पण केले आहे. विकी हा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा निकटवर्तीय आणि खंदा समर्थक मानला जातो. गोळीबारच्या वेळी विकी गणात्रा हा आमदार गायकवाड यांच्याशी बोलण्याकरीता आला होता आणि नंतर आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभवसह केबिनमधून बाहेर जाताना सीसीटीव्ही दिसतोय.
सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 7 फेब्रुवारी 2024 : कल्याणच्या भाजप कार्यकर्ता विकी गणात्रा याला आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. विकी गणात्रा हा केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील आणि आमदार गणपत गायकवाड यांचा निकटवर्तीय, तसेच खंदा समर्थक मानला जातो. गोळीबारच्या वेळी विकी गणात्रा हा आमदार गणपत गायकवाड यांच्याशी बोलण्याकरीता आला होता. या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये विक्की देखील आहे. या प्रकरणात दोन जण अद्याप फरार आहेत.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड, संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना अटक करण्यात आली होती. आमदाराचा मुलगा वैभव गायकवाड, आमदारांचे सहयोगी विकी गणात्रा आणि नागेश बडेकर फरार असल्याचे सांगण्यात आले होते. आता विकी गणात्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणमध्ये कोणताही कार्यक्रम विकी याची उपस्थिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी गणात्रा याने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे आत्मसमर्पण केले आहे. कल्याणमध्ये विकी गणात्रा भाजपचा सक्रीय कार्यकर्ता आहे. त्याच्या भावाकडे भाजपचे पद आहे. भाजपच्या कल्याणमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्यात विकी याची उपस्थिती होती. विकी गणात्रा हा केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजप आमदार गायकवाड यांचा निकटवर्तीय आहे.
10 तारखेनंतर कल्याण लोकभेतील भाजप कार्यकर्तेची बैठक होणार, सूत्रांची माहिती
10 तारखेनंतर कल्याण लोकभेतील भाजप कार्यकर्तेची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपमधील कार्यकर्ते शिवसेना नेत्यांवर नाराज आहेत. आम्ही योग्यवेळी जाहीर भूमिका मांडू, नाव न घेण्याच्या अटीवर भाजप पदाधिकाऱ्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेत भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना चित्र दिसू लागलं आहे.
गायकवाड यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स 2017 पासून
गणपत गायकवाड यांना 15 नोव्हेंबर 2017 ला स्वयंघोषित अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीच्या खंडणीसाठी धमकी दिल्यानंतर गृह खात्याने गणपत गायकवाड यांना स्वरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर बाळगण्याचे लायसन्स दिले होते. अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याने 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी पुजारीने दिली होती. पुजारीने दोन दिवसानंतर पुन्हा गणपत गायकवाड यांना धमकीचा फोन केला होता. हा प्रकार गांभीर्याने घेणारे आमदार गायकवाड यांनी त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती.
आयुक्तांच्या सूचनेनुसार आमदार गायकवाड खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करण्यास गेले असता त्यांना वाईट अनुभव आला होता. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल पोलीस घेणार नसतील तर सर्व सामान्यांची काय अवस्था होईल? असा सवाल करत गायकवाड यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी गृह खात्याने गणपत गायकवाड यांना स्वरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर बाळगण्याचे लायसन्स दिले होते.