मुंबई : मुंबईत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका गुन्हेगार तरुणीने आपल्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी शेवटचा गुन्हा करण्याचे ठरवले. यात ती यशस्वीही झाली पण अखेर शेवटचा गुन्हा खरोखरच शेवटचा ठरला. बोरिवली जीआरपी पोलिसांनी तरुणीला गोव्यातील रेस्टॉरंटमधून अटक केली. शलाका सुरेश गवस असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे. तरुणीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तरुणीने केलेल्या शेवटच्या गुन्ह्यातील चोरीचा कॅमेरा जप्त केला आहे.
शलाका ही अट्टल गुन्हेगार आहे. मात्र तिला आता गुन्हेगारी सोडून प्रियकराशी लग्न करुन नवीन जीवन सुरु करायचे होते. लग्नानंतर शलाका पतीसोबत नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी तिला पैशांची गरज होती.
यातूनच तिने पैसे मिळवण्यासाठी शेवटचा गुन्हा करुन पैसे मिळवायचे आणि गोव्यात प्रियकरासोबत सेटल व्हायचे ठरवले होते. यासाठी ती प्रयत्नात असतानाच तिची पीडितेशी गाठ पडली.
पीडित मुलगी ही नोकरीच्या शोधात होती. नोकरीच्या शोधात असतानाच तिची कुणाच्या ओळखीतून आरोपी तरुणीशी ओळख झाली. तरुणीने पीडितेला मालाड स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले होते.
महिलेने पीडितेला सांगितले की, तुला नोकरी मिळू शकते पण त्यापूर्वी कॅमेरा आवश्यक असेल. पीडितेने नोकरी मिळवण्यासाठी पवई येथून कॅनन कंपनीचा कॅमेरा घेतला होता. ज्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.
दोघी पुन्हा एकदा मालाड स्थानकात भेटल्या आणि पीडितेने कॅमेरा आोरपी तरुणीला दिला. दुसऱ्या दिवशी पीडितेला भेटू असे सांगून तरुणी स्टेशनवरून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पीडित महिला मालाड स्थानकावर आली आणि तरुणीला फोन करू लागली, पण महिलेचा फोन बंद होता.
यानंतर पाडितेने बोरीवली जीआरपी पोलिसात तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर बोरीवली पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. तरुणीचा शोध घेत पोलीस गोव्यात दाखल झाले.
बोरीवली जीआरपी पोलिसांनी गोव्यातील एका रेस्टॉरंटमधून महिलेला अटक करून महिलेकडून कॅमेरा जप्त केला आहे. तपासात आरोपी महिला बऱ्याच दिवसांपासून अशी फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.