Rupal Ogrey Murder Case : एअरहोस्टेसची हत्या करणाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; पोलीस लॉकअपमध्ये काय घडलं?
छत्तीसगडहून असंख्य स्वप्न ऊरात घेऊन मुंबईत आलेल्या रुपल ओगरेची मुंबईत हत्या झाली होती. एअर होस्टेस होण्याचं तिचं स्वप्न होतं. तिची ट्रेनिंगही सुरू होती. सर्व काही चांगलं सुरू होतं. पण एक दिवस अचानक...
मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मरोळ परिसरात एका एअरहोस्टेसची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. विशेष म्हणजे मारेकऱ्याने एअरहोस्टेस रुपल ओगरेची हत्या केल्यानंतर आतून दरवाजा लावून घरातून पलायन केलं होतं. त्यामुळे मारेकरी आत आला, पण बाहेर गेला कसा? असा सवाल पोलिसांना पडला होता. पण पोलिसांनी 8 पथके तयार करून या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी तब्बल 35 लोकांची कसून चौकशी केली. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता एका सफाई कर्मचाऱ्याने रुपलची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आणि तुरुंगात ठेवलं. पण त्यानंतर या सफाई कामगाराने टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अंधेरी पोलिसांनी रुपल ओगरे हिच्यावर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या केल्याप्रकरणी विक्रम ओटवाल याला अटक केली होती. 35 वर्षी विक्रम हा सफाई कर्मचारी आहे. त्याला अटक केल्यानंतर अंधेरीतील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण शुक्रवारी रात्री त्याने लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्याने पँटीने गळफास घेतल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
वादावादी हातघाईवर आली
रुपल आणि विक्रम यांच्यात वादावादी झाली होती. दोघांचं भांडण हातघाईपर्यंत आलं होतं. रुपल ज्या सोसायटीत राहत होती. त्या सोसायटीत तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. या भांडणाचा राग त्याच्या डोक्यात घोळत होता. त्यातूनच त्याने रुपलवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिची धारदार चाकूने हत्या केली आणि पळून गेला.
म्हणून पकडला गेला
पोलिसांनी 35 जणांची चौकशी केल्यानंतर विक्रमचीही चौकशी सुरू केली होती. त्याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. त्याबाबत पोलिसांनी त्याला विचारलं असता त्याला उत्तरं देता आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. शिवाय सोसायटीत जाताना त्याच्या अंगावर वेगळे कपडे होते. सोसायटीतून दोन तासाने बाहेर आल्यावर त्याच्या अंगात वेगळेच कपडे होते. त्यामुळे त्याच्यावरचा पोलिसांचा संशय बळावला. आणि पोलिसांनी खाक्या दाखवताच विक्रमने गुन्हा कबूल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात ठेवले होते.