1992च्या दंगलीतील फरार आरोपीला डिसेंबर 2022मध्ये अटक! कुठे होता 18 वर्ष? वाचा

| Updated on: Dec 12, 2022 | 8:42 AM

तब्बल 18 वर्षांनंतर 1992 च्या दंगलीतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश! दिंडोशी पोलिसांची कारवाई

1992च्या दंगलीतील फरार आरोपीला डिसेंबर 2022मध्ये अटक! कुठे होता 18 वर्ष? वाचा
अखेर 18 वर्षांनी फरार आरोपीला बेड्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : दिंडोशी पोलिसांनी तब्बल 18 वर्षांनी 1992च्या दंगलीतील फरार आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव तबरेज अजीज खान उर्फ मन्सुरी असं आहे. शनिवारी दिंडोशी पोलिसांनी आरोपी मन्सुरी याला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी केली जाते आहे. गेल्या 18 वर्षापासून पोलीस त्याच्या मागावर होते. पण मन्सुरी हा जवळपास 18 वर्ष लपून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. अखेर त्याचा ठावठिकाणा लागताच पोलिसांनी सापळा रचून शनिवारी त्याला अटक केली.

1992 दंगली प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात एकूण 9 आरोपींवर मुंबई सत्र न्यायालयात दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी दोन आरोपींना सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं होतं. तर एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

उरलेल्या 6 आरोपींबाबत कोर्टाने वॉरंट जारी केला होता. न्यायालयात हजर न राहिल्याने 2003 साली सत्र न्यायालयानं या आरोपींना फरार घोषित केलं होतं आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी, असे निर्देश जारी केले होते. यातील आरोपी क्रमांक 8 असलेला तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मन्सुरी गेल्या 18 वर्षांपासून स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना आता मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना तबरेज खानचा पत्ता शोधून काढला. त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याला मालाडवरुन दिंडोशी पोलिसांनी अटक केली. आता त्याची चौकशी केली जात असून दिंडोशी पोलीस याप्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.