Mumbai Crime : सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते वृद्ध जोडपे, काही वेळाने घरात वृद्ध महिलेचा मृतदेहच आढळला, नक्की काय घडलं?
नेहमीप्रमाणे वृद्ध जोडपे मॉर्निंग वॉकला जायला निघाले. मात्र मॉर्निंगला निघालेले जोडपे घराबाहेर पडूच शकले नाहीत. थोड्या वेळात जे समोर आलं त्याने शेजाऱ्यांना धक्का बसला.
मुंबई / 14 ऑगस्ट 2023 : दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध जोडप्याच्या घरात घुसून लूट केल्याची घटना घडली आहे. यावेळी वृद्ध जोडप्याने आरडाओरडा करु नये म्हणून चोरट्यांनी दोघांच्या तोंडाला टेप लावली होती. यामुळे वृद्ध महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला. तर तिचा पती जखमी झाला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 302 (हत्या), 394 आणि इतर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. सुरेखा अगरवाल असे मयत पत्नीचे नाव आहे. तर मदन अगरवाल असे पतीचे नाव आहे.
वृद्ध जोडप्याच्या तोंडाला टेप लावून लुटले
ताडदेवमधील युसूफ मंझिल इमारतीत अगरवाल जोडपे राहते. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून, ते वडाळा येथे राहतात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वृद्ध जोडपे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडताच तीन जण बळजबरीने आत घुसले. त्यांनी वृ्द्ध जोडप्याला बांधून ठेवत त्यांच्या तोंडाला टेप लावली. यानंतर चोरट्यांनी घरातील दागिने, महागडी घड्याळं आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
तोंडाला टेप लावल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निघून गेल्यानंतर वृद्ध पतीने कसेतरी दारात पोहचत अलार्मचे बटण दाबले. अलार्मचा आवाज ऐकून इमारतीतील शेजारी धावत आले. घरी येऊन पाहिले तर महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र पोलिसांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पतीच्या फिर्यादीवरुन ताडदेव पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.