पालघर : आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी वसईच्या पापडी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या 6 आदिवासी महिलांना चोर समजून चौकीत नेऊन त्यांना दांड्याने मारहाण केली होती.
लाल बावटा पक्षाचे वसई तालुका सचिव कॉ. शेरु वाघ यांनी हा मुद्दा लावून धरला होता. शेकडो आदिवासी महिला पुरुषांनी वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल घेऊन, मिरा-भाईंदर, वसई-विरारचे अप्पर पोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांचे निलंबन केले आहे.
मारहाण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी होऊन, चौकशीत निष्पन्न होईल त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद असल्याचे ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.
भाजीपाला आणायला गेलेल्या 6 आदीवासी महिलांना चोर समजून मारहाण
पोटाची खळगी भरण्यासाठी वसईत कामासाठी आलेल्या सहा आदीवासी महिला 19 नोव्हेंबरला भाजीपाला घेण्यासाठी वसईच्या आठवडा बाजारात गेल्या होत्या. या आदीवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती.
या सर्व महिला मूळच्या पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात राहणाऱ्या आहेत. बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे असे या अधिवाशी महिलांची नाव आहेत. 19 नोव्हेंबर रोजी नाक्यावर काम नाही भेटले म्हणून, या सर्वजणी वसईच्या पापडी येथील आठवडी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा कपडे, राहणीमान पाहून त्या चोरी करण्यासाठी आल्या आहेत का या संशयावरुन तेथील पोलीस कर्मचारी यांनी या या महिलांना रिक्षात बसवून बाजूच्याच पोलीस चौकीत नेले. तिथे पोलिसांनी त्यांना दांड्याने बेदम मारहाण केली असल्याचा आरोप या आदिवासी महिलांनी केला होता.
आदिवासी महिलांना मारहाण झाल्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी आणि आदीवास्यांसोबतही माणसाप्रमाणे वागावे अशी मागणी ही करण्यात आली. त्यानंतर आता मारहाण करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
चोरट्यांचा हिवाळी बार; नाशिकमध्ये एकाच रात्री 5 मेडिकल फोडले, हजारोंची रोकड लंपास
व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा