ठाणे हादरलं! शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडी आणि बंगल्यावर अज्ञातांचा हल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात, त्यांच्यात पक्षाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या बंगल्यावर आणि गाड्यांवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
गणेश थोरात, Tv9 मराठी, ठाणे | 26 डिसेंबर 2023 : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. संबंधित घटना ही कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना काल (25 डिसेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. हल्ला करणाऱ्या इसमांचा फक्त तोडफोड करण्याचा उद्देश होता की आणखी वेगळा काही हेतू होता? याबाबत पोलीस तपास करत आहेत. पण सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर अशाप्रकारे हल्ला करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमांनी माणिक पाटील यांच्या बंगल्याच्या खाली उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांवर हल्ला केला. आरोपींनी वाहनाच्या खिडकीच्या काचांवर काचेच्या बॉटल फेकल्या. तसेच त्यांनी रॉडच्या साहाय्याने हल्ला केला. आरोपींनी किती भयानकपणे हल्ला केला ते सीसीटीव्हीत कैद झालंय. याप्रकरणी कासार वडवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास कासार वडवली पोलीस करत आहेत.
आरोपींनी हल्ला कसा केला?
आरोपींनी हल्ला कसा केला ते सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. हल्ला करणारे एकूण 4 ते 5 जण होते. त्यांच्यातील एक इसम गेटवर चढला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट होतं. तो हेल्मेट घालून बंगल्याच्या आत शिरला. त्याने गाडीच्या काचा फोडल्या. तर इतर अज्ञात आरोपी घरावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला करत होते. सुदैवाने या हल्ल्यात बंगल्यातील कुणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. पण या घटनेमुळे माणिक पाटील यांच्या कुटुंबियांमध्ये काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं.
माणिक पाटील यांनी या प्रकरणी पोलिसांकडे आरोपींना लवकरात लवकर शोधावं आणि कारवाई करावी, अशी मागणी केलीय. तसेच या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेत माणिक पाटील यांनी नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडेदेखील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.