मुंबई: धीरुभाई अंबानी स्कूल उडवून देण्याच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन कॉल करून धमकी देणाऱ्याचा पोलिसांना शोध लागला आहे. लवकरच पोलीस या आरोपीच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे. मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता हा फोन आला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली. शाळेत टाइम बॉम्ब ठेवला असून कोणत्याहीक्षणी शाळा बॉम्बने उडवली जाणार असल्याचं या अज्ञात व्यक्तीने म्हटलं होतं. त्यानंतर त्याने लगेच फोन कट केला होता.
त्यानंतर लगेचच लँड लाइनवर दुसरा फोन आला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने गुजरातमधून बोलत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी आपल्याला पकडावं म्हणून मी हे सांगत आहे. कारण मला पकडल्यावर मला प्रसिद्धी मिळेल. सर्वांचं लक्ष माझ्यावर जाईल. लोकांनी आपल्या विषयी जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, असं या व्यक्तीने म्हटलं. त्यानंतर त्याने फोन कट केला.
शाळा प्रशासनाने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याने या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम 505 (1)(बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. फोन करणाऱ्याचा शोध लागला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
या अज्ञात व्यक्तीने मंगळवारी शाळेच्या लँडलाईनवर फोन केला होता. शाळेत टाइम बॉम्ब फिक्स केला आहे. थोड्याच वेळात बॉम्बस्फोट होणार असून शाळेला उडवून दिलं जाणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. दोनदा फोन करून त्याने आपण गुजरातमधून बोलत असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, अंबानी कुटुंबाशी संबंधित संस्थांना धमकी देण्याचं हे पहिलं प्रकरण नाहीये. या पूर्वी कोकिलाबेन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. अंबानी यांच्या घराबाहेरही स्फोटकांची कार आढळून आली होती. आता शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या शाळेत फिल्मी कलाकार, राजकारणी आणि नोकरशहांचे मुलं शिकतात. मुंबईतील ही सर्वात प्रसिद्ध शाळा आहे. याच शाळेत टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर आदी स्टार्स शिकलेले आहेत.