ती वासना नव्हती, ते प्रेम होतं, बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
मुंबई हायकोर्टाने एका बलात्कार प्रकरणात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला आहे. हायकोर्टाने या प्रकरणातील 26 वर्षीय आरोपीला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील पीडिता ही अवघ्या 13 वर्षांची आहे.
मुंबई | 13 जानेवारी 2024 : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका अल्पवीय मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी 26 वर्षीय आरोपीला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी ही 13 वर्षांची आहे. कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर करत असताना एक महत्त्वाच निरीक्षण नोंदवलं आहे. “वासनेसाठी आरोपीने पीडितेचं लैंगिक शोषण करणं तसं हे प्रकरण नाही. दोन्ही अशा नात्यात होते, ज्यात वासना नव्हती तर प्रेम होतं”, असं निरीक्षण न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी नोंदवलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या या निकालाची सध्या जोरदार चर्चा आहे. आरोपीच्या विरोधात पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराची 13 वर्षीय मुलगी ही 23 ऑगस्ट 2020 ला काही पुस्तक घेण्यासाठी घराबाहेर निघाली होती. पण ती तिथून परतली नव्हती. मुलीच्या वडिलांनी तिला खूप शोधलं. पण ती सापडली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी हरवल्याची पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि या तपासात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी मुलीला शोधून काढलं होतं.
अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं होतं की, शेजारी राहणाऱ्या नितीनने आपल्याजवळ प्रेम असल्याची भावना व्यक्त केली होती. मुलगी 22 ऑगस्टला आपल्या आजीच्या घरी गेली होती. या दरम्यान आरोपी नितीनने पीडितेला लग्नाचं वचन दिलं. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या घरातून दागिने आणि पैसे घेऊन नितीन सोबत निघून गेली होती. त्यानंतर दोघेजण महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी राहिले. पोलिसांच्या तपासात आणि मुलीच्या जबाबात याबाबत सविस्तर माहिती समोर आली.
कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद
अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी अमरावती जिल्ह्याती एका पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नितीनच्या वकिलांनी कोर्टात केलेला युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. अल्पवयीन मुलगी ही तिच्या इच्छेनुसार आरोपीच्या विरोधात गेली होती. त्यामुळे त्याला जामीन मंजूर व्हावा, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. तर समोरच्या पक्षाच्या वकिलांनी त्याचा विरोध केला. त्यांनी जामिनाची याचिका फेटाळण्याची विनंती केली.
‘पीडितेने प्रेमसंबंधांची कबुली दिलीय’, हायकोर्टाचं निरीक्षण
दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. “पीडिता ही 13 वर्षांची आहे. तिची सहमती ही प्रासंगिक नाही. तपास अधिकाऱ्यांनी नोंद केलेल्या जबाबानुसार, पीडितेने घर सोडलं होतं. ती मैत्रिणीकडे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी आलीच नाही. ती आरोपीसोबत निघून गेली होती. पीडितेने आपल्या जबाबात आरोपीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांची कबुली दिली होती”, असं न्यायमूर्ती म्हणाल्या.
‘आरोपीला जेलमध्ये ठेवून कोणताच उद्देश साध्य होणार नाही’
“मुलीच्या जबाबावरुन स्पष्ट होतं की, ती आरोपीसोबत अनेक ठिकाणी थांबली आणि तिने कोणतीही तक्रार केलेली नाही. याशिवाय ती त्याच्या प्रेमात असल्याने त्याच्यासोबत गेल्याचं तिने सांगितलं आहे. आरोपीचं वय 26 वर्षे आहे आणि ते प्रेम संबंधांमुळे एकत्र आले. या प्रकरणात चार्जशीट दाखल केली गेली आहे. पण 2020 पासून या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणाचा अंतिम तपास पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो. पण तितके दिवस आरोपीला कैदेत ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याला जेलमध्ये ठेवून कोणताच उद्देश साध्य होणार नाही”, असं हायकोर्ट म्हणालं.