Mumbai Crime | मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 17 बांगलादेशींना अटक
देशात घुसखोरी ही एक मोठी समस्या आहे. अनेकजण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात येतात आणि काही गैरकृत्यदेखील करतात. मुंबई पोलिसांनी अशाच काही बांगलादेशींच्या विरोधात मोठी कारवाई केलीय. मुंबई पोलिसांनी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे.
गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे. बोरीवली पोलिसांवी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. या सर्वांचा इतर देशांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या या सर्वांकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जप्त केली आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आले होते. हे सर्व बांगलादेशी भारताची बनावट कागदपत्रे बनवून परदेशात जाण्याचा कट रचत होते.
मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. “ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. बोरिवली पोलिसांनी प्रथमच 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे”, असं अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं.
पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?
काही बांगलादेशी बोरिवलीत फिरत असल्याची माहिती बोरिवली पोलिसांच्या एटीसी अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नालासोपारा आणि विरार परिसरात काही बांगलादेशी लोक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारा आणि विरारमधून काही बांगलादेशींनाही अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केलीय.
अटकेतील एक जण एजंट?
या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि इतर अनेक कागदपत्रे असल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. अटकेतील 17 जणांपैकी एक जण हा आरोपी आहे, जो अनेक दिवसांपासून भारतात राहतो आणि तो एजंट म्हणून काम करतो. त्यानेच सर्वांना बोलावलं होतं.
अटकेतील सर्व 17 बांगलादेशी नागरीक हे मुंबईहून कुवेतला जात होते. यापैकी सुमन मोमीन सरदार (वय 31 वर्षे), उमर फारुख मुल्ला (वय 27 वर्ष), सलमान अयुब खान (वय 34 वर्ष) हे तिघेही बोरिवलीला व्हिसा घेण्यासाठी आले होते. याप्रकरणी बोरिवली पोलीस सध्या मुंबई आणि परिसरात किती बांगलादेशी राहतात, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, या सर्व बाबींचा तपास करत आहेत.