Yusuf Lakdawala : डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा (Yusuf Lakdawala died) ऑर्थर रोड कारागृहात (Arthur road jail) मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा (Yusuf Lakdawala died) ऑर्थर रोड कारागृहात (Arthur road jail) मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. आज त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर तर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता.
2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.
प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना 2010 मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायलयाने याप्रकरणी लकडावाला यांची निर्दोष सुटका केली होती.
युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल 2019 मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला. मग मे 2021 मध्ये युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आली. हैदराबादच्या नवाबाची खंडाळा (Khandala) येथील 50 कोटी रुपयांची जमीन अल्प किमतीत लाटल्याचा आरोप होता. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडाळ्यातील कथित मनी लॉन्ड्रिंग
पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर (Hyderabad Nawab Himayat Nawaz Jung Bahadur) यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन 50 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र लकडावाला यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे 11.5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर 104 (सीटीएस नंबर 11, 11A, 11B) वरील जागा 4 एकर आणि 38 गुंठ्यांची आहे.
कोणत्या कलमांअंतर्गत कारवाई
मावळ तालुका उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर लकडावाला आणि इतरांविरूद्ध फसवणूक, कट रचणे अशा आरोपांखाली भादंवि कलम 465, 466, 467, 468, 471, 420, 120-B आणि 201 नुसार, तर भारतीय नोंदणी अधिनियम कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अभिनेत्री साधना यांच्या केसमध्येही कारवाई
76 वर्षीय युसूफ लकडावाला यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला. याआधी अनेक वेळा समन्स बजावूनही लकडावाला चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. याआधी, अभिनेत्री साधना यांच्या राहत्या जागेला बळकावून धमकावल्याबद्दल युसूफ लकडावाला आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
संबंधित बातम्या
बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप
देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या बिल्डर युसूफ लकडावालाला अटक