जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत मोठी वाढ, दोन गुन्हे दाखल; उद्या भाजप, रिपाइंचं आंदोलन
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं चांगलंच महागात पडलं आहे. हे आंदोलन करत असताना आव्हाड यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. या प्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. हा प्रकार अनावधानाने झाल्याचं आव्हाड यांनी सांगितल्यानंतरही भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. भाजपने आव्हाड यांच्या विरोधात उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंही उद्या आंदोलन करून आव्हाड यांचा निषेध नोंदवणार आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपकडून ही तक्रार करण्यात आली होती. तर आव्हाड यांच्या विरोधात रायगडमध्ये दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
रायगडमध्य जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. या आदेशाचं आव्हाड यांनी उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि 22 कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे पोलीस फिर्यादी झाले आहेत.
भाजप आक्रमक
दरम्यान, आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कांदिवली, सीएसटी, दादरसह राज्यातील विविध भागात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं सुद्धा उद्या आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे.