उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी (18 सप्टेंबर) घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता. यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.
हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
दरम्यान उल्हासनगर शहरात कालच सुशांत गायकवाड या गुंडाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्येचा आणखी एक प्रकार उल्हासनगर शहरात घडल्यामुळे उल्हासनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दिवसाढवळ्या भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात पाचही मारेकऱ्यांना बेड्या ठोकत गजाआड केलं. सुशांत गायकवाड उर्फ गुड्या असं हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे. सुशांत हा शुक्रवारी (17 सप्टेंबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास उल्हासनगरच्या नेताजी चौकात काही मित्रांसह उभा होता. यावेळी तिथे आलेल्या एका टोळक्यानं त्याच्यावर चाकू, कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सुशांत हा काही काळ रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. सुशांत याचा पूर्वीचा मित्र आणि त्याच्यासोबत 3 गुन्ह्यांमध्ये सहआरोपी असलेल्या आकाश शिंदे उर्फ चिंट्या याच्याशी सुशांत याचे काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यानेत त्याची हत्या केल्याच पोलिसांच्या तपासात उघड झालं.
हेही वाचा :
बायकोवर विवाहबाह्य संबंधांचा संशय, नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकलं
केरळातील बँकेवर साताऱ्याच्या पैलवानांचा दरोडा प्रकरण, सोनं विकून घेतलेली चांदी सोनाराकडून जप्त