मुंबई : मुंबईतील अक्सा बीच येथे एका लॉजवर छापा (Raid) टाकून जोडप्यांकडून पैसे उकळू पाहणाऱ्या तीन बनावट अँटी करप्शन ऑफिसर (Fake Anti Corruption Officer)चा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मालवणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) करत पोलीस ठाण्यात आणले. मात्र रात्री उशिर झाल्यामुळे महिलांची नावे लिहून त्यांना सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगत सोडून देण्यात आले. दुसऱ्या दिवशी दोन्ही महिला फरार झाल्या आहेत. मालवणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मनोज कुमार रामसय्या सिंग, अनिता वर्मा आणि काजिया खान अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी अक्सा बीचवरील एका लॉजवर छापा टाकला. तिघांनी ग्राहकांचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. लॉजमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या खोलीतून हाकलून दिले आणि त्यांच्या पालकांचे फोन नंबर मागितले. पालकांना माहिती देण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. जोडप्यांकडून 5-5 हजार रुपयांची मागणी केली. मात्र लॉज मालकाला या तिघांवर संशय आल्याने त्याने मालवणी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच मालवणी पोलीस तात्काळ लॉजवर हजर झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी बनावट अधिकारी म्हणून आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडून पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरा झाल्यामुळे मालवणी पोलिसांनी पुरुष आरोपीला अटक करून दोन्ही महिलांची नावे लिहून त्यांना सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगून सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी दोन्ही महिला फरार झाल्या आहेत. सर्व आरोपी एका खाजगी संस्थेच्या अंतर्गत एनजीओ चालवतात आणि त्यांच्या संस्थेचे नाव देखील ‘एंटी करप्शन कमेटी ऑफ इंडिया’ असे सांगितले जात आहे. मनोज कुमार रामसय्या सिंग आणि अनिता वर्मा हे पुण्याचे रहिवासी असून काजिया खान मालाड पश्चिम मालवणी येथील आझमी नगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Fake anti-corruption officers busted for raiding Aqsa Beach lodges)