फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी, वसुलीसाठी रिक्षा पलटी, कल्याण स्टेशन परिसरात भर रस्त्यात राडा
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. विशेष म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भर रस्त्यात चालती रिक्षा पलटी केली. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 26 ऑक्टोबर 2023 : कल्याणमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कल्याण पश्चिमेत रेल्वे स्टेशन परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फायनान्स कंपनीचे हप्ते थकवल्याने वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क धावती रिक्षा थांबवण्यासाठी रिक्षा पलटी केली. फायनांन्स कंपनीचे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भर रस्त्यात रिक्षा चालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण पश्चिम येथील रिक्षा चालक-मालक असोशियन संघटना आक्रमक झालीय. या संघटनेने फायनान्स कंपनीला पत्र पाठवत इशारा दिलाय. जीव जाईल, अशी रिकवरी कराल तर रिकवरी करणाऱ्या एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा संघटनेकडून कंपनीला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कल्याण महात्मा फुले पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 29 वर्षीय रिक्षा चालक तरुण शनिवारी (21 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालवण्यासाठी गेला. यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी आम्ही फायनान्स कंपनीचे माणसं असून तुझ्या रिक्षाचे 17 हप्ते बाकी आहेत. तुला 10 हजाराची रक्कम भरावी लागेल, असं या फायनान्स कंपनीच्या इसमांनी रिक्षाचालक तरुणाला सांगितलं.
रिक्षाचालक तरुण पैसे भरायला तयार झाला नाही म्हणून त्यांनी भर रस्त्यावर त्याला शिवीगाळ सुरू केली. यादरम्यान रिक्षा चालकाने त्यांना पोलीस स्थानकात चला आपण तिकडे बोलू, असं सांगितलं. यावेळी रिक्षा पोलीस ठाण्याच्या दिशेने नेत असताना या रिकवरी एजंटने त्या रिक्षा चालकाची रिक्षा पलटी केली. तसेच भर रस्त्यातच त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.
हा संपूर्ण प्रकार समोर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. फायनान्स कंपनीच्या कर्माचाऱ्यांचा दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्हिडिओ व्हायरल होताच रिक्षा युनियनचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले आहेत. संबंधित फायनान्स कंपनीने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा उग्र आंदोलन करून कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकाऱ्यांनी दिलाय.