Param Bir Singh | परमबीर सिंह यांना अटकेची धाकधूक, सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळणार?
निलंबनाची प्रत परमबीर सिंह यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही, तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, अशी पोलीस वर्तुळात चर्चा आहे.
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना राज्य सरकारने अखेर सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईनंतर परमबीर सिंह यांना अटकेची धाकधूक वाढली आहे. कारण 6 डिसेंबरपर्यंत अटक न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची मुदत संपत असल्यामुळे उद्या पुन्हा दिलासा मिळतो का, याकडे लक्ष आहे.
निलंबनाची प्रत परमबीर सिंह यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही, तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, अशी पोलीस वर्तुळात चर्चा आहे.
परमबीर यांच्यावर पाच गुन्हे दाखल
परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंग यांच्याविरोधात एका पोलीस अधिकाऱ्यानेच तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून आपला छळ केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी एफआयआर दाखल केली होती.
काय होते आरोप?
‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.
सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंह अडचणीत
मनसुख हिरेन हत्या आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या खडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पुढील चौकशीत हे प्रकरण कोणते वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
परमबीर सिंह, वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, जबाबात ACP चे मोठे खुलासे
अखेर परमबीर सिंग पोलीस खात्यातून निलंबित; राज्य सरकारचा मोठा निर्णय