महेश अन् गणपत गायकवाड यांच्यातील जमिनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, महेश गायकवाड यांनी थेट उचलले असे पाऊल
गणपत गायकवाड यांचा पार्टनर जो विकासक आहे, गुन्हेगार आहे, त्याने गुंड प्रवृत्तीचे लोक सोबत आणले. त्यांच्याकडे बंदूक अन् इतर हत्यार होते. त्यांनी शेतकऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने जमीन बाळकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
कल्याण डोंबिवली शहरात काही महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलीस ठाण्यात गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्याकडून झाला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. हा प्रकार आहे. त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महायुतीमधील दोन नेत्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आता या दोघांमधील जमिनीचा वाद समोर आला आहे. जमिनीचा सर्व्हे सुरु असताना महेश गायकवाड यांनी हा सर्व्हे बंद पाडला. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
महेश गायकवाड यांचा आरोप
जमिनीचा सर्व्हे सुरु होता. परंतु त्या ठिकाणी काहीच पोलीस बंदोबस्त नव्हता. गणपत गायकवाड यांचा पार्टनर जो विकासक आहे, गुन्हेगार आहे, त्याने गुंड प्रवृत्तीचे लोक सोबत आणले. त्यांच्याकडे बंदूक अन् इतर हत्यार होते. त्यांनी शेतकऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने जमीन बाळकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
पोलिसांवर राजकीय दबाब
काही शेतकरी माझ्याकडे आले. त्यानंतर आपण पोलिसांना त्या ठिकाणी नेले. माझे सहकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी त्या लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गणपत गायकवाड यांच्यावर आंधळे प्रेम करणारे नेते आहेत ते पोलिसांवरती दबाव टाकत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलिसांवर राजकीय दबाव येत आहे, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.
फरार आरोपी फिरताय…
माझ्यावर हल्ला करणारा गणपती गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड त्याचा भाचा कुणाल पाटील अन्य लोक फरार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात ते फिरत असून त्यांना अटक केली जात नाही. पोलिसांनी ठरवले तर ते त्यांना अटक करु शकतात. परंतु पोलिसांवर दबाव येत असल्यामुळे कारवाई होत नाही. पोलिसांचे हात राजकीय लोकांनी बांधलेले आहेत, असे कोणाचे नाव न घेता महेश गायकवाड यांनी म्हटले.