मुंबई : गुजरातमधील 40 वर्षीय व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी मुंबईतील दहिसर पोलिसांनी एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांचा व्यवसाय करणारा व्यापारी मनीष पटेल हा एक महिन्यापूर्वी व्यवसाय वृद्धीसाठी मुंबईत आला होता. त्यावेळी तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये गळा चिरलेल्या स्थितीत बेशुद्धावस्थेत आढळला होता.
नेमकं काय घडलं?
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना मनीष पटेल राहत असलेल्या इमारतीच्या व्यवस्थापकाचा फोन आला होता. मनीष पटेल कोणाच्याही फोनला उत्तर देत नाहीत किंवा दरवाजाही उघडत नाहीत, असे त्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पटेल काही जणांना व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत भेटणार होता, मात्र तो फोनला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्या व्यक्तींनी बिल्डिंगच्या मॅनेजरकडे धाव घेतली होती.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्येवर शिक्कामोर्तब
पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडले आणि मनीष पटेल याला भगवती हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदन अहवालात मनीष पटेल याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सुरुवातीला आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली होती, मात्र शव विच्छेदन अहवालानंतर आम्ही सोमवारी या प्रकरणाचे हत्याकांडात रुपांतर केले.”
सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला
अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी केली असता मनीष पटेल यांना शनिवारी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण गजानन पाटील म्हणाले की, “आम्हाला समजले आहे की पटेल आणि अटक केलेल्या एका आरोपीसह अन्य दोघे घरात पार्टी करत होते.”
पोलिसांनी सांगितले की, पटेल भाड्याने घर शोधत असताना दोन संशयितांच्या संपर्कात आला. दोन्ही आरोपी पटेल यांच्याकडे वारंवार येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. राहुल रामनाथ शर्मा (20) असे दोन संशयितांपैकी एकाचे नाव असून तो मजूर आहे. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. हा खून रागाच्या भरात झाल्याचा अंदाज आहे. मात्र आम्ही हत्येचा नेमका हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा, पिंपरीत आरोपीकडून 26 लाखांची फसवणूक
45 वर्षीय पीडितेने रचलेली कथा अविश्वसनीय, मुंबईतील 26 वर्षीय तरुणाला बलात्कार प्रकरणात जामीन