‘आर्यन खान प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी मला पाच लाखांची ऑफर’, हॅकर मनिष भंगाळेचा खळबळजनक दावा
आर्यन खान प्रकरणात आता हॅकेर मनिष भंगाळेने एन्ट्री मारली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगेळे वळण मिळताना दिसत आहेत. या प्रकरणी पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी आपल्याला पाच लाखांची ऑफर आली, असा खळबळजनक दावा मनिष भंगाळेने केला आहे.
जळगाव : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाकडून आजही दिलासा मिळालेला नाही. त्याच्या जामीन अर्जावर आता गुरुवारी (28 ऑक्टोबर) सुनावणी होईल. दुसरीकडे या प्रकरणात आता हॅकेर मनिष भंगाळेने एन्ट्री मारली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगेळे वळण मिळताना दिसत आहेत. या प्रकरणी पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी आपल्याला पाच लाखांची ऑफर आली, असा खळबळजनक दावा मनिष भंगाळेने केला आहे. याबाबत मनिष भंगाळेने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.
मनिष भंगाळेचा नेमका दावा काय?
“माझ्या इथे जळगावला 6 ऑक्टोबरला दोन जण आले होते. आलोक जैन आणि शैलेश चौधरी अशी त्यांची नावे होती. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्यांनी काही नंबर सांगितले. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होता. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. तसेच त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सअॅपचॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल या संदर्भातील होती ती आर्यन खान व्हॉट्सअॅप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितलं. तसेच यासाठी पाच लाख देऊ असं सांगितलं”, असा दावा मनिष भंगाळेने केला आहे.
‘मोठमोठे केंद्रीय मंत्री आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं’
“त्यांनी मला मुंबईत भरपूर काम देऊ, असं सांगितलं. मोठमोठे केंद्रीय मंत्री आमच्या संपर्कात आहेत. तुमची लाईफ बनून जाईल, असं सांगितलं. हा सगळा प्रकार मला विचित्र वाटला. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचा नंबर ट्रू कॉलरला चेक केला तर सॅम डिसूजा म्हणून नाव दिसलं. त्यानंतर दोन दिवसांनी टीव्हीवर सगळे आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडीओ बघितले. याबाबत मी मुंबई पोलिसांना, केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पाठवलंय”, असं मनिष भंगाळेने सांगितलं.
कोर्टात व्हॉट्सअॅप चॅटवरही युक्तीवाद
आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी आर्यनसह, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. यावेळी वकिलांनी व्हॉट्सअॅप चॅट हा पुरावा धरता येणार नाही असा निकाल कोर्टाने याआधी अनेकदा दिला आहे, असा युक्तीवाद केला. तसेच आरोपींकडे फार कमी प्रमाणात ड्रग्ज सापडलं. पण कुणीही ड्रग्जचं सेवन केलेलं नव्हतं. तसेच त्यांच्या रक्ताची तपासणी केली गेली नाही. तर मुनमुन धमेचाच्या वकिलांनी आपल्या अशिलाविरोधात बोगस केस दाखल केल्याचा दावा केला. तसेच आर्यनच्या वकिलांनी आरोपींना बेकायदेशीररित्या अटक केल्याचा युक्तीवाद केला. या प्रकरणावर एनसीबीचे वकील अनिल सिंग यांना आपली बाजू मांडण्यासाठी आज वेळ मिळाला नाही. पण उद्या अडीच वाजता एनसीबीचे वकील आपला युक्तीवाद मांडतील. त्यानंतर आर्यनच्या जामीनावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
आर्यन खानला पुन्हा झटका, आजची रात्र जेलमध्येच काढावी लागणार, कोर्टात काय-काय घडलं?
आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?