होय ती अफवाच, दुबईहून आलेल्या खासगी विमानात स्फोटकं सापडले नाहीत, खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध सुरु
मुंबई विमानतळावर निनावी फोन आल्याने मोठी खळबळ उडाली. दुबईहून आलेल्या एका खासगी विमानात आरडीएक्स स्फोटकं असल्याची माहिती या निनावी फोनद्वारे देण्यात आली.
मुंबई : मुंबई विमानतळावर निनावी फोन आल्याने मोठी खळबळ उडाली. दुबईहून आलेल्या एका खासगी विमानात आरडीएक्स स्फोटकं असल्याची माहिती या निनावी फोनद्वारे देण्यात आली. या फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हाटअलर्ट जारी करत शोध मोहिम सुरु केली. मात्र, असे कोणतेही स्फोटकं विमानात आढळली नाहीत. त्यामुळे पोलीस आता फोन कुणी केला याचा तपास करत आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास निनावी फोन आला. दुबईहून आलेल्या खासगी विमानात स्फोटकं असल्याची माहिती समोरच्या व्यक्तीने फोनद्वारे दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी करत शोध मोहिम सुरु केली. मुंबई विमानतळावर दुपारच्या सुमारास एक खासगी विमान दुबईहून आलं होतं. पोलिसांनी त्या विमानात जाऊन तपास केला. मात्र, कोणतेही स्फोटकं पोलिसांना मिळाले नाही. त्यामुळे संबंधित निनावी फोन कोणी माथेफिरुने केला का किंवा दुसऱ्या कुणी इतर उद्देशाने केला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा
काही दिवसांपूर्वी मंत्रालयातही अशा प्रकारचा निनावी फोन आला होता. मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये एक निनावी फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली. मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. अखेर तापासाअंती नागपूरच्या एका तरुणाने हा खोडसाळपणा केल्याचं उघड झालं होतं.
मुंबईच्या ताज हॉटेलमध्येही धमकीचा निनावी फोन
गेल्यावर्षी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या कराची येथून निनावी फोन आला होता. यावेळी ताज हॉटेल बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने हॉटेल कर्मचाऱ्यांना व्हाट्सअॅप नंबरदेखील दिला होता. “तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी दिलेला व्हाट्सअॅप नंबर तपासा. मी पाकिस्तानहून बोलतोय याची तुम्हाला खात्री पटेल”, असं तो हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना म्हणाला होता. “कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला अतिरेकी हल्ला सगळ्यांनी बघितला. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार”, असंदेखील तो फोनवर म्हणाला होता.
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा
मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली