Rupal Ogrey : बदललेला ड्रेस, अंगावरील जखमांमुळे मारेकरी जाळ्यात; एअरहोस्टेस रुपल ओगरे हत्याकांडातील नवी अपडेट समोर
रुपलची हत्या केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी ड्युटीवर आला. कुणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तो वागत होता. अनेकांच्या नजरा चुकवण्याचाही त्याने प्रयत्न केला. आपण काही केलंच नाही असं तो दाखवत होता. पण पोलिसांनी आधीच...
मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : अंधेरीच्या मरोळ परिसरात एका एअर होस्टेसची हत्या करण्यात आली. राहत्या घरातच रुपल ओगरे हिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी जेव्हा तिच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरात जागोजागी रक्त पडलेलं होतं. रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. त्यामुळे रुपलची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण छत्तीसगडहून आलेली रुपल मुंबईत एकटीच राहत होती. तिची कुणाशी फारशी ओळखही नव्हती. त्यामुळे कुणाशी दुश्मनी असण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही रुपलची हत्या कशी झाली? कुणी केली? असे प्रश्न पोलिसांना पडले. विशेष म्हणजे घरातून काहीच चोरीला गेलेलं नव्हतं. त्यामुळे हत्येमागे चोरीचा उद्देश नसल्याचंही स्पष्ट होत होतं. मग हत्या केली तर का केली? या प्रश्नाने पोलिसांना भेडसावलं होतं.
रुपल ओगरेच्या हत्येनंतर पोलिसांनी आठ जणांचं पथक तयार केलं होतं. प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. सर्वात आधी पोलिसांनी शेजारीपाजाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर सोसायटीच्या वाचमनची चौकशी केली. सोसायटीचं व्हिजीटर बुकही चेक केलं. त्यानंतर थेट सीसीटीव्ही फुटेजही बारकाईने पाहिले. यावेळी पोलिसांना एक क्ल्यू मिळाला. त्याचाही त्यांनी शोध घेतला. रुपलची हत्या झाली त्या दिवशी सोसायटीत सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत 35 लोक आल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांनी या सर्व लोकांची कसून चौकशी केली. पण घटनास्थळी कोणीच असल्याचं दिसून आलं नाही. कुणावरही संशय व्यक्त करावा असा व्यक्ती दिसला नाही.
दोन तासाने बाहेर पडला
त्यानंतर पोलिसांनी सोसायटीचे सुरक्षा रक्षक आणि हाऊसकिपिंग स्टाफची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना 35 वर्षीय विक्रम अटवाल या सफाई कर्मचाऱ्यावर संशय झाला. तो सकाळी 11.30 वाजता रुपलचा फ्लॅट असलेल्या इमारतीत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आश्चर्य म्हणजे तो बिल्डिंगमधून दोन तासानंतर म्हणजे दीड वाजता बाहेर पडला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय वाढला.
म्हणून संशय वाढला
विशेष म्हणजे विक्रमच्या हातावर आणि गळ्यावर जखमांच्या ताज्या खुणा होत्या. या जखमा कशा झाल्या? असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर त्याच्याकडून योग्य उत्तर आलं नाही. पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. त्यात सफाई कामगारांच्या ड्रेसमध्ये विक्रम ड्युटीवर आल्याचं दिसून आलं. पण इमारतीतून परतताना दुसरे कपडे घातलेले होते. त्यामुळे त्याच्यावरील संशय अजून वाढला.
अन् पोपटासारखा बोलला
पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेऊन त्याची उलट तपासणी सुरू केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. विक्रमने एका झटक्यात पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. त्याने रुपलवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचंही उघड झालं. बलात्कार करता न आल्याने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी नंतर रुपलच्या शरीराचे फॉरेन्सिक स्वॅब कलेक्ट केले. रुपलवर बलात्कार झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी हे स्वॅब घेण्यात आले.