ट्रेन थांबली नसती तर चेतन सिंह आणखी प्रवाशांवर गोळ्या झाडणार होता? तपासात धक्कादायक माहिती उघड
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंहने पोलिसांना धक्कादायक जबाब दिला आहे. ट्रेन थांबली नसती तर तो आणखी प्रवाशांवर गोळ्या झाडणार होता, असा जबाब त्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : मुंबईत 31 जुलैची पहाट एक वाईट बातमी घेऊन समोर आली होती. जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच ट्रेनमधील आणखी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे गोळीबार करणारा आरपीएफ जवान होता. या जवानाचं नाव चेतन सिंह असं होतं. तो गोळीबार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला अटक केली तेव्हा तो सुरुवातीला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत होती. पोलीस त्या बाजूने प्रयत्न करत होते. या दरम्यान चेतन सिंह याच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेतन सिंहने धक्कादायक जबाब नोंदवला आहे.
आरोपी चेतन सिंहच्या चौकशीत मोठा खुलासा झालाय. ट्रेन थांबली नसती तर आरोपी आणखी लोकांना गोळ्या घालू शकला असता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी चेतन सिंह याने सांगितलं की, ट्रेन मध्येच थांबली नाही आणि त्याला संधी मिळाली तर तो आणखी लोकांना मारणार होता.
चेतन सिंहची सगल आठ तास चौकशी
रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुमारे 8 तास आरोपी चेतन सिंहच्या चौकशीदरम्यान त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की, पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना मारण्याची आपली शेवटची इच्छा होती. चेतन सिंहची ही सर्व वक्तव्ये स्वत:ला मनोरुग्ण सिद्ध करून वाचवण्याचा नवा मार्ग असू शकतो, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.
चेतन सिंह पोलिसांना सहकार्य करत नाहीय?
चेतन सिंह हा आजारपणाचा बहाणा करुन पोलिसांना चौकशीसाठी मदत करत नाही, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी चेतन सिंह याची पत्नी रेणू सिंह हिची तब्बल 11 तास चौकशी केली होती. रेणू सिंहला चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आलं होतं. यावेळी तिने विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याची माहिती समोर आली होती.
रेणू सिंहने पोलिसांना चेतन सिंह याच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. तसेच तिने पोलिसांना चेतन सिंहच्या आजारपणाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील पोलिसांसमोर सादर केले होते. तर दुसरीकडे चेतन सिंह हा आजारपणाचं कारण सांगत रेल्वे पोलिसांना संभ्रमात टाकणारे जबाब देत आहे. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरु आहे.