Kalyan Crime | आई-वडिलांचं स्वप्न मोठं, पण मुलाने केलं खोटं, असा मुलगा नको गं बाई!
कल्याण जीआरपी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा मुलगा आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतो हे ऐकल्यानंतर पोलीसही अवाक झाले आहेत. पोलिसांनी या तरुणाला समजावलं आहे. पण या तरुणाचं हे कृत्य त्याच्या आई-वडिलांसाठी धक्कादायक आहे.
कल्याण | 20 ऑक्टोबर 2023 : काही जण स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा कशाचाच विचार करत नाहीत. ते फक्त काम करत राहतात. काम हाच त्यांचा परमार्थ असतो. त्यामुळे ते कामात स्वत:ला वाहून घेतात. त्यांची हीच मेहनत शेवटी उपयोगात येते आणि त्यांना हवं असणारं यश मिळतं. पण काही जण यश प्राप्त करण्यासाठी शॉर्टकट मार्गांचा अवलंब वापरतात. तर काही जण नको त्याच मार्गाला भरकटतात. या मार्गाला अराजकतेची किनार लागते आणि त्यांचं आयुष्य चुकीच्या दिशेला लोटलं जातं. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये समोर आलाय.
मध्य रेल्वेच्या कसारा ते मुंबई (सीएसटी) दरम्यान अनेक गुन्हे घडत असतात. या दरम्यान कल्याण लोहमार्ग पोलिसांनी लेडीज डब्ब्यात पोलिसांच्या वर्दीतील एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क पोलिसांचा युनिफॉर्म घालून महिला डब्यात प्रवास करत होता. त्याचं हे कारण ऐकून सुरुवातीला पोलीसही चक्रावले. अभिषेक सानप असं या तरुणाचं नाव आहे. तो मुळात पोलीस नाही. पण पोलिसांची वर्दी घालून लेडीज डब्ब्यात फिरत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिषेक सानप या 23 वर्षीय तरुणाच्या आई-वडिलांची आपल्या मुलाने पोलीस अधिकारी बनावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्याने अभ्यास करुन पोलीस बनणं जास्त आवश्यक होतं. पण त्याने वेगळीच शक्कल लढवली. तो आई-वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी पुण्यामध्ये चक्क एका दुकानात गेला. त्याने तिथे कपडे घेतले आणि ते कपडे त्याने शिवून घेतले. तो ते कपडे घेऊन पुण्याहून मालाडला आला. तो मालाडला त्याच्या नातेवाईकांकडे गेला. त्यानंतर तो सायंकाळी कसाऱ्याला काही कामानिमित्त मुंबईवरून निघाला. मात्र पोलिसांचा गणवेश घालून तो महिला डब्यात जाऊन बसला.
कल्याण ते वाशिम रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल डब्यात गस्त घालत असलेले कल्याण लोहमार्ग पोलीसही यावेळेस महिला डब्यात चढले. त्यांनी अभिषेकला पोलीस खात्याविषयी विचारले. तो कुठे कार्यरत आहे? याची माहिती विचारली. मात्र अभिषेकला खऱ्या पोलिसांचे उत्तर देणे जमले नाही. तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचं लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आलं.
लोहमार्ग पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. त्याची विचारपूस केली असता त्याने पोलीस नसून आई-वडिलांसाठी पोलिसांचा युनिफॉर्म शिवल्याचे पोलिसांना सांगितलं. लोहमार्ग पोलिसांनी सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने पोलिसांचा गणवेश वापरून इतर कोणाला लुटले आहे का? याचा तपास सुरू केला आहे.