मुंबई : स्वस्त सामानाची ऑर्डर करुन त्यात महागड्या वस्तू पॅकिंग करुन पाठवत कंपनीची फसवणूक करणाऱ्या अमेझॉनच्या दोन कर्मचाऱ्यांना चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विनय रामाश्रय यादव आणि शहनवाज शमशाद अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोघे आरोपी अमेझॉन कंपनीत पॅकिंगचे काम करायचे. आरोपींनी स्वतः वायपरची पाकिटे ऑर्डर केली होती. मात्र वायपरच्या बॉक्समध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेले मोबाईल, मेमरी कार्ड, ब्लूट्यूथ यासह महागड्या इलेक्ट्रीक वस्तू टाकल्या आणि ग्राहकांना दुसऱ्या वस्तू पॅक करुन पाठवल्या.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाईल, मेमरी कार्ड, ब्लूट्यूथ यासह अनेक महागड्या इलेक्ट्रिक वस्तू जप्त केल्या आहेत.
जप्त केलेल्या वस्तूंची बाजारात किंमत 3 लाख 65 हजार 246 रुपये आहे. सध्या पोलीस दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई करत आहेत.
गोरेगाव पश्चिमेत भगतसिंग नगर परिसरामध्ये कार पार्किंग करण्यावरून झालेल्या राड्यात तरुण गंभीर जखमी झाला. गौरव गरुडे असे 32 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.
रस्त्यावर कार पार्किंग करत असताना तिथे असलेल्या पाच ते सहा लोकांनी त्याला विरोध केला आणि बाचाबाची करून लाठी आणि दगडाने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो सध्या कोमात आहे.