30 वर्षांपूर्वी पवई आयआयटीत टॉपर, अमेरिकेत नोकरी; मुंबईत लेक्चरला आला अन् चोरट्यांनी लुटला !
लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत अवघ्या 2 तासात दोन्ही चोरट्यांना अटक केली. चोरट्यांकडून चोरुन नेलेला लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करत शर्मा यांना सुखरूप परत केला आहे.
मुंबई : मुंबईत लेक्चर देण्यासाठी आणि गेट टुगेदरसाठी आलेल्या अमेरिकन इंजिनियरला लुटल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मात्र बोरिवली जीआरपीच्या सतर्कमुळे अवघ्या दोन तासात इंजिनियरचा चोरीला गेलेला लॅपटॉप आणि मोबाईल परत मिळाला. बाल गोविंद शर्मा असे लुटण्यात आलेल्या इंजिनियरचे नाव आहे. इतकंच नाही तर जीआरपीच्या या स्तुत्य कार्यामुळे शर्मा यांना त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन तर मिळालाच, शिवाय पवई आयआयटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमालाही त्यांनी वेळेवर हजेरी लावली.
नेमके काय घडले?
बोरिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणारे बाल गोविंद शर्मा हे अमेरिकेत इंजिनीअर आहेत. ते पवई आयआयटी मुंबई येथे व्याख्यान देण्यासाठी आणि गेट टुगेदरमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आले होते.
बाल गोविंद शर्मा 30 वर्षांपूर्वी पवई आयआयटीमध्ये टॉपर होते. त्यानंतर अमेरिकन सरकारने त्यांना न्यूयॉर्कला बोलावले आणि अमेरिकेचे नागरिकत्व दिले. टॉपरला 30 वर्षे पूर्ण झाल्यामुळे बाल गोविंद शर्मा यांचे व्याख्यान पवई IIT मध्ये ठेवण्यात आले होते. तसेच गेट टुगेदरचा कार्यक्रम होता, ज्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.
बाल गोविंद शर्मा हे अमेरिकेहून विमानाने अहमदाबादला आले. शर्मा 6 जानेवारी रोजी अहमदाबादहून ट्रेनने बोरिवलीला पोहोचले आणि बोरिवलीहून पवई आयआयटीला जाणार होते. मात्र प्रवासाने थकल्यामुळे ते बोरिवली रेल्वे स्टेशनच्या गेस्ट रूममध्ये विश्रांतीसाठी थांबले. तेव्हाच चोरट्यांनी त्यांची लॅपटॉपची बॅग चोरून पळ काढला.
लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या दोन तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या
याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत अवघ्या 2 तासात दोन्ही चोरट्यांना अटक केली. चोरट्यांकडून चोरुन नेलेला लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करत शर्मा यांना सुखरूप परत केला आहे.
मोहम्मद अर्शद मोहम्मद आझाद आणि मोहम्मद इस्लाम इदरीश अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असून, ते नुकतेच मुंबईत आले होते. सध्या पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली असून, आता पुढील कारवाई सुरू आहे.