भारताची गुप्त माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला दिली, तरुणाला ठाण्यातून अटक
ठाण्यातील एका तरुणाने भारताची संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, ठाणे | 13 डिसेंबर 2023 : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका इसमाने भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ठाणे एटीएसने पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला गोपनीय माहिती देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य का केलं? त्याच्यासोबत आणखी कुणाचा या प्रकरणात समावेश आहे का? त्याने इतकं मोठं धाडस का केलं? तो देखील पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला जावून मिळाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्र एटीएस याप्रकरणी आता चौकशी करत आहे.
तरुणाने गुप्त माहिती पुरवल्याच्या बदल्यात पैसे घेतले
संबंधित तरुण पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या संपर्कात होता. या तरुणाने गुप्त माहिती पुरवल्याच्या बदल्यात पैसेही घेतल्याची माहिती समोर आलीय. महाराष्ट्र एटीएसने सबंधित तरुणाला अटक केली आहे. आरोपीने मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला ही माहिती पुरवल्याचं समोर आलंय. सोशल मीडिया तसेच व्हॉट्सपवरून ही माहिती पाकिस्तानात पुरवली गेली असल्याचा एसटीएसचा दावा आहे. ठाणे एसटीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याची माहिती सातत्याने चर्चेत येत असते. काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली होती. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे हनीट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांनी व्हाट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी संपर्क ठेवल्याची माहिती समोर आलेली. यातून त्यांनी अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली होती, अशी माहिती समोर आली होती.