दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, पतीने पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळलं
आरोपी फिरोज आणि रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यापासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
भिवंडी : पत्नीने दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीला राग अनावर झाला. त्यानंतर संतप्त पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली असून या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिरोज शेख असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर रुखसाना असे होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनां मध्ये वाढ होत असतानाच असाच एक कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबात घडला आहे. आरोपी फिरोज आणि रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यापासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न
त्यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी रुखसानाने तात्काळ अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न करत घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या घटनेत ती गंभीर होरपळून भाजली असल्याने तिला परिसरातील इतर नातेवाईकाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करत आहेत.
नाशकात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं
दुसरीकडे, पत्नीला ‘हॅपी बर्थडे’ म्हणून शुभेच्छा देत पतीनेच तिच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपी पतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यात पत्नीच्या माहेरी जाऊन पतीने हल्ला केला. यामध्ये पती-पत्नी दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.
वाढदिवशीच पतीने पत्नीला शुभेच्छा देत पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिन्नरमध्ये समोर आला आहे. त्यानंतर संशयित आरोपीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. संशयित आरोपी असलेल्या पतीचे नाव संतोष पवार असे आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोघा पती-पत्नींमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
वाढदिवसानिमित्त नांदूर शिंगोटे येथे माहेरी आलेल्या कमल पवार यांच्या घरात घुसून पती संतोषने हा प्रकार केला. हल्ल्यात पती-पत्नी दोघेही अत्यवस्थ असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांकडून होत आहे.
संबंधित बातम्या :
हॅपी बर्थडे बायको, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोटात चाकू खुपसला, नाशकातील धक्कादायक घटना
बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह, जवळ दारुची बाटली, गुलाबाचे फूल आणि ब्लाऊज
पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसात आठ खून, 38 वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या