क्राईम शो पाहून चिमुरडी म्हणालेली माझ्यावरही लैंगिक अत्याचार, आता पाच वर्षांनी 55 वर्षांचा शेजारी निर्दोष सुटला
पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टात आरोपीच्या मुलाने आपल्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा केला होता
मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केल्याच्या पाच वर्षांनंतर 55 वर्षीय व्यक्तीची विशेष पोक्सो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. टीव्हीवर क्राईम शो पाहिल्यानंतर मुलीच्या आईने तिला “चांगला आणि वाईट स्पर्श” शिकवला होता. त्यानंतर चिमुकलीने आपल्यावरही ‘अत्याचार’ झाल्याची तक्रार केली होती. शिवाय, मध्यमवयीन पुरुषावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांना ‘कथित पीडित’ मुलीच्या वडिलांसोबत पाच हजार रुपयांवरुन झालेल्या वादाचीही पार्श्वभूमी होती.
“घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. घटनेच्या दिवसाचा, तारखेचा आणि वेळेचा पुरावा अस्पष्ट आहे. आरोपीवर लावण्यात आलेला आरोप सिद्ध करण्यासाठी ते कमी पडतात.” असं सांगत कोर्टाने आरोपीची निर्दोष सुटका केली. आरोपी दरम्यानच्या काळात जामिनावर बाहेर होता.
काय आहे प्रकरण?
पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टात आरोपीच्या मुलाने आपल्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा केला होता. मुलाच्या दाव्यानुसार, 2015 मध्ये नवरात्राच्या काळात त्याने पीडित कुटुंबाचा डीजे सेट 11 दिवस वाजवला होता. त्याचे पैसे देण्याचे आश्वासन त्याला देण्यात आले होते, परंतु ते दिले गेले नाहीत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी जेव्हा त्याला पुन्हा बोलावले गेले, तेव्हा त्याने डीजे वाजवण्यास नकार दिला. आपण पुन्हा पैसे मागितले, तेव्हा दोन कुटुंबांमध्ये मोठे भांडण झाले आणि मुलीच्या वडिलांनी आपल्या वडिलांना (आरोपी) मारहाण केली, असं आरोपीचा मुलगा कोर्टात म्हणाला होता.
क्राईम शोनंतर मुलीची तक्रार
मुलीच्या आईने 9 जानेवारी 2016 रोजी न्यायालयाला सांगितले की, तिने एका क्राईम शोचा एक भाग पाहिला होता. ज्यामध्ये मालिकेतील व्यक्तिरेखेने त्याच्या नातवंडाचे लैंगिक शोषण केले होते. शोच्या शेवटी, होस्टने प्रेक्षकांना त्यांच्या मुलांना शरीराच्या त्या चार अवयवांबद्दल शिकवण्याचा सल्ला दिला, जिथे मुलांनी अन्य कोणालाही स्पर्श करु देऊ नये. महिलेने हे आपल्या मुलीला समजावून सांगितले. त्यानंतर तिने आईला आरोपीबद्दल सांगितले होते.
घटनेचा तपशील अस्पष्ट
मुलीने न्यायालयाला सांगितले होते की आरोपी तिला गच्चीवर घेऊन गेला आणि तिचे लैंगिक शोषण केले. तिने सांगितले की त्याने हे कृत्य “खूप पूर्वी” केले आहे. तिने सांगितले की जेव्हा तिने तिच्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिने पोलिस तक्रार दाखल केली. मात्र न्यायालयाने सांगितले की मुलीने ठिकाण, वेळ आणि तारीख याबद्दल तपशील दिलेला नाही. तसेच एफआयआर दाखल करण्यातही अनाकलनीय विलंब झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
चार अल्पवयीन मुलांनी गाठलं, 65 वर्षीय महिलेवर रेल्वे क्रॉसिंगजवळ गँगरेप